देशभरात नाशिकच्या कांद्याला मागणी, क्विंटलचा भाव २३५१ रुपये

सामना प्रतिनिधी, नाशिक

अनेक राज्यांना पूरपरिस्थितीचा फटका बसल्याने तेथील कांद्याचे नुकसान झाले. परिणामी, देशभर नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे. उमराणे बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला कमाल २३५१ रुपये क्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी वाढले. भाव आणखी वाढण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यंदा उन्हाळ कांदा बाजारात दाखल झाल्यापासून मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली होती. गुजरात, आंध्रप्रदेश, तसेच दक्षिणेकडील राज्यांना पूराचा तडाखा बसला, तेथील कांदा खराब झाला. मध्यप्रदेशातील कांदा संपला असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे.

पिंपळगावला आज ३० हजार ७२० क्विंटल इतकी आवक होती, कमाल २२४३, किमान १२००, सरासरी १९०१ रुपये भाव होता. लासलगावला आवक २३ हजार, तर भाव कमाल २१६१, किमान १०००, सरासरी १९०१ होता. उमराणेत कमाल २३५१, किमान १३००, सरासरी १७०० रुपये दर मिळाले आहेत. जिल्ह्यात अजूनही ५० टक्के उन्हाळ कांदा शिल्लक आहे.