वीज कंत्राटी कामगाराची होतेय पिळवणूक: कामगार संघाचे आयुक्तांना निवेदन

45


सामना प्रतिनिधी । नगर

नगर पुणे रोडवरील सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालयात वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या शासन स्तरावर उपस्थित करण्याकरीता सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांना महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या कामगारांनी निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट वीज कंत्राटी कामगार संघ ही भारतीय मजदुर संघाशी संलग्न अशी नोंदणीकृत संघटना असून वीज उदयोगातील महानिर्मिती,महापारेषण व महावितरण या तिन्ही कंपनीतील वीज कंत्राटी कामगाराचे प्रतिनिधीत्व करते. या वीज उदयोगात कंत्राटी पध्दतीवर गेली ५ ते १५ वर्षे कामगार काम करत असून कंत्राटदारांकडून या कामगारांची मोठी पिळवणूक होते वेतनात अनाधिकृत कपात होणे, वेतन वेळेत न होणे, भविष्य निर्वाहनिधीचा योग्य भरणा न करणे, नोकरीची शाश्वती नाही, नोकरीसाठी पैसे व बॉन्ड पेपर दयावे लागणे यामुळे कामगार त्रस्त आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगार पध्दत बंद करून वीज मंडळातील पूर्वाश्रमीची रोजंदारी कामगार पध्दत पुन्हा सुरू करा या व अन्य अनेक मागण्यांसाठी शांततेने पुणे येथून बुधवार २० फेब्रुवारी २०१९ रोजी वाकडेवाडीतील कामगार आयुक्त कार्यालयात कामगार आयुक्ताना निवेदन देउन मंगळवार दि २६ फेब्रुवारी रोजी विधानसभा किंवा मंत्रालय मुंबई पर्यत जाणार आहे. सदर मोर्चामध्ये महाराष्टातील सर्व जिल्हयामधून सुमारे ६०० कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत, तरी आपण आपल्यावतीने शासनाकडे या मागण्यांबाबत कळवून सहकार्य करावे. यावेळी नगर जिल्हा कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष प्र. ना. शिंदे, सचिन पाटील, संतोष शेळके, आतिष लांडगे, देविदास जगताप, कारभारी क्षिरसागर, कृष्णा साठे, पिंटू पन्हाळे, पप्पू गायकवाड, राहुल काळे, राजेश म्हसे, बाळासाहेब किर्तने आदीसह जामखेड, संगमनेर, कोपरगांव, तिसगांव, नेवासा, पाथर्डी येथील कंत्राटी कामगार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या