घाटकोपरमध्ये बेकायदा बांधकामावर पालिकेचा हातोडा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांना नाहक जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पालिकेने आज घाटकोपर पश्चिम परिसरातील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडकरील अतिक्रमण करून केलेली बांधकामे तोडली. ही बांधकामे घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितप याचीच असल्याचे बोलले जात आहे.

घाटकोपरच्या अल्ताफ नगरमध्ये (गोळीबार रोड) एका खासगी जागेकर अतिक्रमण करून दोन व्यावसायिक आस्थापने सुरू करण्यात आली होती. ही बेकायदा बांधकामे तोडण्यासाठीची कारवाई परिमंडळ ६ चे उपायुक्त नरेंद्र बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
घाटकोपरमध्ये घडलेली इमारत दुर्घटना ही दुर्दैवी आहे. मात्र अशा घटनेतही राजकारण करणे चुकीचे आहे. या गुह्यातील आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच शिवसेनेची भूमिका आहे. कारण बेकायदा बांधकामांना शिवसेनेने नेहमीच विरोध केला आहे.
– प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

साईदर्शन इमारत दुर्घटने प्रकरणी रहिवाशी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब
घाटकोपर येथील दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी सुनील शितप याच्याभोवती पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आहे. याप्रकरणात आतापर्यंत १७ रहिवाशी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यानुसार पोलीस शितपची चौकशी करीत आहेत. दरम्यान, गहाळ झालेल्या मौल्यवान वस्तूबाबतही रहिवाशांकडून माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. साईदर्शन इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. यात १७ रहिवाशांचा बळी गेला. याप्रकरणी सुनील शितपला पोलिसांनी अटक केली. ज्यावेळी इमारत पडली त्यावेळी नेमके काय झाले तसेच शितपने तळमजल्यावरील पिलर कसा आणि का तोडला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी रहिवाशी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे.