मंदिरे हटविण्याच्या मोहिमेविरोधात आज नाशिक बंद

सामना प्रतिनिधी । नाशिक

उच्च न्यायालयाच्या आदेशाने बुधवार, ८ नोव्हेंबरपासून अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक मठ मंदिर बचाव संघर्ष समितीने दिली आहे.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अनधिकृत ठरविण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. हे सर्वेक्षण चुकीचे असल्याने फेरसर्वेक्षण करावे, असे आदेश सोमवारी महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. मात्र, न्यायालयाचा आदेश असल्याने कारवाईवर महापालिका प्रशासन ठाम आहे. भद्रकालीतील श्रीमंत साक्षी मंदिराजवळ मठ मंदिर बचाव संघर्ष समितीची बैठक झाली. न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून पुरातन, प्राचीन, तसेच रहदारीस अडथळा नसलेली मंदिरेही हटविली जात आहेत. न्यायालयाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून मंदिरावर हातोडा मारण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला.

न्यायालयाने १९६० किंवा सन २००९ असा कुठलाही उल्लेख केलेला नाही, अंतिम मुदत दिलेली नाही, असे असताना ही चुकीची कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले. लोकाश्रय असलेली मंदिरे हटवू नयेत, रस्त्यात येत नाही, कुणालाही त्रास नाही किंवा तशी तक्रार नाही, अशी मंदिरे हटवू नये, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी नाशिक बंदचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, महंत शिवमदास महाराज, महंत भगवानदास महाराज, महंत नरसिंहाचार्यजी महाराज, सतिश शुक्ल, गजानन शेलार, सुनील बागुल हे हजर होते.