नोटबंदीनंतर ३४ दिवसात ३५ टक्के नोक-या गेल्या, महसूल ५० टक्कयांनी घसरला

फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णय देशाला प्रगतिकडे न नेता अधोगतीकडे नेत असल्याचे समोर आले आहे.  केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ३४ दिवसातच लघु उद्योगांना त्याचा जोरदार फटका बसला असून ३५ टक्के लोकांवर बेकारीची कु-हाड कोसळली. तर देशाचा महसूल ५० टक्कयांनी घसरला आहे. नोटबंदीनंतर देशातील उत्पादकांच्या संस्थेने (AIMO) प्रसिध्द केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

ही परिस्थिती अजून काही दिवस कायम राहिली तर मार्चपर्यंत या आकड्यात दहा टक्कयांनी वाढ होण्याची शक्यता या संघटनेने व्यक्त केली.

या संस्थेच्या अखत्यारित अनेक लहानमोठ्या उद्योगांचा समावेश आहे. यातील बहुतेक उद्योग रोख रकमेवर चालणारे आहेत. यामुळे या उद्योगांवर नोटबंदीचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर पन्नास दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल असे आश्वासन दिले होते. यामुळे मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून उद्योजकांनी महिनाभर नोटटंचाईची झळ सोसली. पण पन्नास दिवस उलटून गेले तरी बँक व एटीएममध्ये पुरेसे पैसे उपलब्ध करुन देण्यात आलेले नाहीत. यामुळे रोख रकमेवर आधारित लघु उद्योग डबघाईला येण्याची भीती व्यापा-यांच्या आणि कामगारांच्या मनात निर्माण झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. नोटबंदीची झळ सर्व उद्योगांना बसणार हे अपेक्षित होते .याचपार्श्वभूमीवर आतापर्यंत या संस्थेने  सर्वच क्षेत्रातील उद्योगांवर नोटबंदीचा कसा परिणाम झाला यावर चारवेळा सर्वेक्षण केले आहे. यातील तीन सर्वेक्षणांमध्ये नोटबंदीमुळे लघु उद्योग व रोख रकमेवर चालणा-या उद्योजकांना फटका बसल्याचे समोर आले आहे. तर चौथ्या सर्वेक्षणाचा अहवाल येणे अजून बाकी आहे.

बांधकाम क्षेत्र,वस्त्रोद्योग,निर्य़ात क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करावी लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.यासाठी संस्थेने सरकारला जबाबदार ठरविले आहे. कुठलेही नियोजन न करता घेतलेला नोटबंदीचा निर्णय,  नोटटंचाई,पैसे काढण्यावर घालण्यात आलेली मर्य़ादा,पैसेच मिळत नसल्याने कामगारांची अनुपस्थिती,नोटबंदीचा रियल ईस्टेटला बसलेला फटका,या सर्व कारणांमुळे देशातील सर्वच लघुउद्योग संकटात असल्याचे संस्थेने अहवालात स्पष्ट केले आहे