फसफसलेल्या नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेला फटका

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदी फसल्याचे बुधवारी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असतानाच नोटाबंदीमुळे नऊ महिन्यांनंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसत आहेत. जीडीपी ५.७ टक्क्यांखाली आला असून तीन वर्षांतील हा नीचांक आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल स्टेटीस्टिक्स ऑफिसरने (सीएसओ) गुरुवारी २०१७-१८च्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी जारी केली.

नोव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, भ्रष्टाचाराविरुद्ध नोटाबंदी असल्याचे जाहीर केले होते. मात्र ९ महिने २२ दिवसांनी रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीचा ‘हिशेब’ दिला तेव्हा हा बार फुसका निघाला. बाद केलेल्या नोटांचे मूल्य होते १५.४४ लाख कोटी. यातील १५.२८ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले. फक्त १६ हजार कोटींच्या नोटा जमा झाल्या नाहीत. वास्तविक तीन लाख कोटी रुपये काळा पैसा बाद ठरेल असे म्हटले होते, परंतु ९९ टक्के बाद नोटा परत आल्या.

२०१६-१७च्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीमध्ये (जानेवारी ते मार्च) नोटाबंदीचा परिणाम झाल्याने जीडीपी ६.१ टक्के होता, परंतु नोटाबंदीचे साइड इफेक्ट सुरूच आहेत. त्याचा फटका २०१७-१८च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) बसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी या काळात जीडीपी तब्बल ७.९ टक्क्यांवर गेला होता. सध्याचा ५.७ जीडीपी हा तीन वर्षांतील नीचांकी आहे.

‘वेगाने वाढणाऱया अर्थव्यवस्थे’चे स्वप्न दूरच

‘जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था’ असे बिरुद मिरविण्यापासून हिंदुस्थान अद्याप  दूरच आहे. चीनचा जीडीपी ६.९ टक्के आहे. त्यापासून हिंदुस्थानची अर्थव्यवस्था किती तरी दूर आहे. जीएसटी अंमलबजावणीतील त्रुटींचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे ‘सीएमओ’ने म्हटले.