नोटाबंदीची 2 वर्ष: तो निर्णय अत्यंत दुर्दैवी, मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2016मध्ये सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या दुर्दैवी आणि अपशकुनी निर्णयाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निर्णयाने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था आणि समाजावर जो भयंकर परिणाम झाला, तो आज स्पष्ट दिसतो आहे’, अशा कडक शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत.त्यावेळी बोलताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या त्या निर्णयावर टीका करत आज देशाच्या अर्थव्यवस्थेची झालेली वाईट स्थिती, उद्योग व्यवसायाला बसलेला फटका, बेरोजगारांचे वाढलेले प्रमाण या साऱ्यांसाठी नोटाबंदीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

नोटाबंदीने सर्वांनाच त्रास झाला, मग तो कोणत्याही जात, धर्म, लिंग, वंश अथवा पेशाचा असो. असं म्हणतात की काळ जखम भरून काढतो, पण नोटाबंदीच्या जखमा भरण्याऐवजी दिवसागणिक अधिक चिघळत चालल्या आहेत, खोल होत चालल्या आहेत, अशा शब्दात त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेच्या गंभीर स्थितीचे वर्णन केले आहे.

ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. त्याचे आणखी परिणाम देखील पाहायला मिळत आहे. लघुउद्योग आणि छोटे व्यापार ज्यांना हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते तो नोटाबंदीमुळे नष्ट झाला आहे. नोकऱ्या निर्माण होत नसल्याने रोजगारावर याचा परिणाम झाला असून तरुण बेरोजगारांची संख्या वाढली आहे. इन्फास्ट्रक्टचरसाठी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्ज आणि इतर सेवांवर देखील भयंकर परिणाम झाला आहे. नोटाबंदीमुळेच डॉलरच्या तुलनेत रुपया पडला त्याचा फटका मॅक्रो-इकनॉमीला बसला आहे.