उद्योगपती मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच मोदींनी केली नोटाबंदी!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशातील आपल्या बडय़ा 15-20 उद्योगपती मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली होती. नोटाबंदीनंतर या बडय़ा उद्योगपतींनी काळा पैसा पांढरा केला असा हल्लाबोल आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. नोटाबंदीमुळे छोटे-मध्यम व्यापारी आणि सामान्य जनतेचे कंबरडे मोडले. त्यामुळे नोटाबंदी हाच देशातील सर्वात मोठा घोटाळा, भ्रष्टाचार आहे, असा थेट आरोपही राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत नोटाबंदी आणि राफेल विमान खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. रिझर्व्ह बँकेच्या अहवालावरून नोटाबंदी पूर्णपणे फसल्याचे स्पष्ट होते. नोटाबंदी ही केवळ चूक नव्हती तर घोटाळा होता असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी

  • नोटाबंदी जाहीर करताना पंतप्रधान मोदींनी काळापैसा थांबेल, बोगस नोटा बंद होतील अशी अनेक आश्वासने दिली होती, परंतु यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नाही.
  • पंतप्रधान मोदींनी जाणूनबुजून नोटाबंदी करून गरीबांच्या पायावर कुऱहाड मारली. नोटाबंदीने छोटय़ा, मध्यम व्यापाऱयांचे नुकसान झाले. बडय़ा उद्योगपतींना लाभ झाला. अमेझॉनसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना नोटाबंदीचा फायदा झाला.
  • मोदींनी आपल्या 15-20 बडय़ा उद्योगपती मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठीच नोटाबंदी केली. नोटाबंदीनंतर या उद्योगपतींनी काळा पैसा पांढरा केला.
  • लोकांच्या खिशातून पैसे काढून बडय़ा उद्योगपतींचे खिसे भरण्याचे काम मोदींनी केले.
  • भाजपचे अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या गुजरातमधील जिल्हा बँकेत 700 कोटींचा काळा पैसा पांढरा केला गेला.
  • नोटाबंदीने बेरोजगारी वाढली. देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला. नोटाबंदी का लादली याचे उत्तर मोदींनी देशातील जनतेला दिले पाहिजे.
  • नोटाबंदीने बँकांचे बुडीत कर्ज (एनपीए) वाढले. यूपीए सरकारच्या काळात एनपीए 2.50 लाख कोटी होता. आता 12 लाख कोटींवर गेला आहे.

राफेल घोटाळाही मित्रांसाठीच

नोटाबंदीप्रमाणेच राफेल विमान खरेदी घोटाळादेखील मित्रांसाठीच करण्यात आला, असा आरोप राहुल गांधींनी केला. या घोटाळ्याद्वारे उद्योगपती अनिल अंबानी यांना पंतप्रधान मोदींनी मदत केली. राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. अनिल अंबानी यांनी काँग्रेसवर खटले दाखल केले आहेत. अंबानी यांनी कितीही खटले दाखल केले तरी सत्य बदलणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.