नोटाबंदी म्हणजे फसलेला प्रयोग, अमेरिकन मासिकाची टीका

1

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

नोटाबंदी म्हणजे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा फसलेला प्रयोग आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अशी स्पष्ट टीका अमेरिकेतील प्रतिष्ठत मासिक ‘फॉरेन मॅगझिन’ने आपल्या ताज्या अंकात केली आहे.

या अंकात अर्थशास्त्राचे अभ्यासक, लेखक जेम्स क्रेबट्री यांचा नोटाबंदीवर सविस्तर लेख आहे. क्रेबट्री हे सिंगापूरच्या के. ली. कुआन यू स्कूलचे वरिष्ठ रिसर्च फेलो आहेत. नोटाबंदी हा सर्वात धाडसी निर्णय असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून वारंवार केला जातो, मात्र क्रेबट्री यांनी स्पष्टपणे हा निर्णय चुकीचा ठरल्याचे म्हटले आहे. ५०० आणि हजाराच्या नोटा अचानक चलनातून बाद केल्या. त्यामुळे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसली. याचे विपरीत परिणाम आता दिसत आहे. २०१७ चा हिंदुस्थानचा आर्थिक विकासदर खाली आला आहे याकडे त्यांनी लेखामध्ये लक्ष वेधले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विकासासाठी काही बदल केले तेव्हा हिंदुस्थानी जनतेने हे बदल स्वीकारले होते, त्याचे स्वागत केले होते. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनता निराश झाली. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयातून काहीतरी धडा घ्यावा असेही लेखात म्हटले आहे.

जनतेचे हाल; अर्थव्यवस्था ठप्प
नोटा बदलून घेण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी हिंदुस्थानातील सामान्य जनतेचे खूप हाल झाले. अनेक तास जनता रांगेत उभी होती. नोटाबंदीमुळे हिंदुस्थानातील रोखीने व्यापार करणारी अर्थव्यवस्था ठप्प झाली. त्याचा मोठा फटका बसल्याचे क्रेबट्री यांनी म्हटले आहे.