‘या’ देशात बुरखा घालाल तर १ लाखांचा दंड!

सामना ऑनलाईन । कोपनहेगन

डेनमार्कमध्ये सरकार बुरखा घालण्यावर प्रतिबंध लादण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखा घालण्यावर सरकार प्रतिबंध करणार आहे. बुरख्यामुळे चेहरा पूर्णपणे झाकला जातो आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. इंडिपेंडेंटने याप्रकरणी सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे.

वृत्तानुसार, सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा हिजाब घालण्यावर सरकार बंदी आणण्याचा विचार करत आहे. सरकारी आदेशाचे पालन न करणाऱ्यास दंडाचा सामना करावा लागणार आहे. यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये दंडाची रक्कम १२० पाउंड (१० हजार ७०० रुपये) असणार आहे. एकापेक्षा जास्त वेळा कायद्याचे उल्लंघन केल्यास ही रक्कम १ लाखापर्यंत असणार आहे.

‘सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या समोर येताना चेहरा झाकून ठेवल्याने डेनिश समाजाच्या मुल्ल्यांवर विपरीत परिणाम होतो. बंदीमुळे समाजातील लोकांमध्ये एकमेकांप्रति भरोसा आणखी वाढला जाईल’, असे डेनमार्कचे न्याय मंत्री सोरेन पापे पाउसेन यांनी म्हटले आहे.

डेनमार्कच्या आधी युरोपीय देशांमधील फ्रान्स, बेल्झीयम, नेदरलँड, बुल्गारिया आणि जर्मनी या देशांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घातली होती. डेनमार्कमध्ये मुस्लिमांची संख्या कमी असल्याचे या बंदीचा प्रभाव खूप कमी लोकांवर पडेल.