देवगड-जामसंडेची पाणी समस्या यंदाही भेडसावणार

सामना प्रतिनिधी । देवगड

तालुक्यातील देवगड-जामसंडे या दोन गावांना दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीवरून पाणी पुरवठा केला जातो. एप्रिल, मे महिन्यात देवगड जामसंडे गावाकडून जास्त प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे दहिबाव गावाच्या आजूबाजूच्या ११ गावांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे देवगड जामसंडे या दोन गावांना एप्रिल, मे महिन्यात पाणी पुरवठा अन्नपुर्णा नळ योजनेवरून बंद केला जाईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी बैठकीत दिला. तसेच नोव्हेंबर अखेरीस या योजनेवर बंधारा घालण्यात येतो मात्र अद्यापही हा बंधारा घालण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

देवगड पंचायत समितीची मासिक सभा येथील किसानभवन सभागृहात सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी सचिव तथा गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, उपसभापती संजय देवरूखकर उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत देवगड तालुक्यात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत पावणाई रोख रू. १ लाख व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत तळवडे रोख रू. ५० हजार व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक ग्रामपंचायत वळीवंडे रोख रू. २५ हजार व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आली. तसेच स्वच्छता मित्र करंडक महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ गट प्रथम क्रमांक-अनघा पंडीत, द्वितीय क्रमांक-मृण्मयी पावसकर, तृतीय क्रमांक-प्राजक्ता शिंदे यांना अनुक्रमे रोख रू. ५ हजार, ३ हजार, २ हजार व प्रशस्ती पत्रक तसेच वरिष्ट गटात प्रथम क्रमांक रोशनी ठुकरूल, द्वितीय क्रमांक संध्या देवरूखकर, तृतीय क्रमांक भाग्यश्री नवरे यांनाही मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रोख रू. ५ हजार, ३ हजार, २ हजार व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. या अनुषंगाने गाव गाता गजाली फेम नाम्याच्या पत्नीची भूमिका बजावणारी देवगड पंचायत समितीची सदस्या शुभा कदम यांचा सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला.

या सभेत ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेले सौरदीप चोरीला जातात याबाबत सखोल चौकशी होऊन याबाबत अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी सदाशिव ओगले यांनी करून चांदोशी येथील अंगणवाडीच्या छप्परावरील कौले वानरांच्या उपद्रवामुळे फुटलेली असून ती कौले खाली पडून विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते. तरी तात्काळ त्यावर आवश्यक ती कार्यवाही करावी. याबरोबरच आरे केंद्रशाळेत चार वर्ग असून यात ६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर शाळेची इमारत ही धोकादायक झाली असून शाळेच्या सभोवार नागरिकांनी संरक्षणासाठी कुंपण घातले आहे. या शाळेची दुरूस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी या शाळेचे दुरूस्तीचे काम अग्रक्रमाने घेण्यात यावे, अशी महत्वपर्णू सूचना पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी मांडली. आरोग्य खात्याचा आढावा घेत असताना आरोग्य खात्यामार्फत देवगड तालुक्यात कुटुंब कल्याणचे उद्दीष्ट ८३ टक्के पूर्ण झाले असून उर्वरीत १७ टक्के उद्दीष्टही लवकरच पूर्ण होईल व देवगड तालुका कुटुंब कल्याणमध्ये १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण केलेला तालुका ठरेल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी सांगून आरोग्य खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सविस्तर दिली. या बैठकीत शिक्षण, एसटी, बांधकाम,म.रा.वि.वि. व अन्य खात्यांच्या विषयावर चर्चा पार पडली.