कस्टमच्या चार लाचखोर उपायुक्तांसह अधीक्षकाला अटक

सामना प्रतिनिधी । मुंबई

न्हावा-शेवा येथील बंदरात आलेल्या मालावर कमी शुल्क लावून तो उतरविण्यासाठी हिरवा कंदील देण्यास कंपनीकडून ५० लाखांची लाच मागणाऱ्या कस्टम विभागाच्या चार उपायुक्तांना सीबीआयच्या अॅण्टी करप्शन ब्युरोने अटक केली. उपायुक्त मुकेश मीना, राजीवकुमार सिंग, सुदर्शन मीना, संदीप यादव आणि अधीक्षक मनीष सिंग अशी या पाच जणांची नावे असून लाचेच्या रकमेचा पाच लाखांचा पहिला हप्ता घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

न्हावा-शेवा येथील बंदरात एका कंपनीचा माल आला होता. अनेक दिवस हा माल उतरविण्यात परवानगी मिळत नव्हती. यावरील कर तसेच इतर शुल्क भरण्याची तयारी असताना कंपनीला माल आणण्याची परवानगी मिळत नव्हती. या परवानगीसाठी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी कंपनीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सीबीआयच्या ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून सीबीआयने गुन्हा दाखल केला.