सिल्लोडचा लाचखोर उपविभागीय अधिकारी जेरबंद

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

शेतजमिनी संदर्भात सुरू असलेल्या प्रकरणी तहसीलदारांनी दिलेल्या निकालावर स्थगिती देण्यासाठा दहा हजारांची लाच घेणारे सिल्लोडच्या उपविभागीय अधिकारी अनिल गोविंदराव माचेवाड यांना त्यांच्या स्वीय सहायकासह  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली.

सिल्लोड तालुक्यातील चांदापूर येथील वकिलाची २९ एकर २१ गुंठे शेतजमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आली होती. या प्रकरणी तहसीलदाराकडे अपील दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर देण्यात आलेल्या निकालावर वकिलाने उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांच्या कार्यालयात अपील केले होते.   अनिल माचेवाड यांनी तहसीलदारांच्या निकालाला स्थगिती देण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. या रकमेतील दहा हजाराचा पहिला हप्ता स्वीय सहाय्यक रत्नाकर महादु साखरे यांच्याकडे  देण्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, तक्रारदार वकीलाने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाNयांनी तक्रारीची शहानिशा केली असता उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांनी रत्नाकर साखरे यांच्यामार्पâत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलीस निरीक्षक भरत राठोड यांच्या पथकाने सापळा रचला आणि रत्नाकर साखरेसह अनिल माचेवाड या दोघांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोघांना अटक करण्यात आली आहे.