आम्ही काय गोट्या खेळायला येतो? दांडीबहादूर अधिकाऱ्यांना उपसभापतीनी सुनावले

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

यापूर्वीच्या सभांना तुम्ही का नाही आलात, या रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांच्या प्रश्नावर “मुंबईतही बैठका असतात” असे उत्तर मिळताच उपसभापती प्रचंड संतापले. दर महिन्याला आम्ही इथे गोट्या खेळायला येतो काय? असा संतप्त सवाल नावले यांनी दांडीबहादूर अधिकाऱ्यांना विचारताच ते निरुत्तर झाले. आज रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक सभेत पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यासभेत बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत सर्वच सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. रस्त्यावरील खड्डे डांबराने भरणार की मातीने यावर रत्नागिरी तालुक्यातील खड्डे आम्ही डांबराने भरू, असे उत्तर देताना १५ डिसेंबर पर्यंत आम्हाला हे खड्डे भरण्याचे आदेश राज्य सरकारकडून आले आहेत असे बांधकाम विभागाच्या उपअभियंतानी उत्तर दिले. बांधकाम विभागाकडे फक्त ८ कामगार असल्यामुळे १३० किमी अंतर असलेल्या रस्त्यांवर काम करताना खूप अडचणी येत असल्याचेही उत्तर उपअभियंता एम.आर. सावर्डेकर यांनी सभागृहात दिले.

बांधकाम विभागाचे अधिकारी आज पहिल्यांदा सभेला उपस्थित होते. उपसभापती सुनील नावले यांनी यापूर्वीच्या सभांची निमंत्रणे तुमच्या कार्यालयाला मिळत नव्हती का? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. अधिकाऱ्यांनी त्याचवेळी मुंबईत बैठका असल्याने तिकडे जावे लागते असे सांगताच दर महिन्याला मुंबईत बैठका असतात काय? आम्ही गोट्या खेळायला येतो काय? अशा शब्दांत उपसभापतीनी आपला संताप व्यक्त केला. सभापती मेघना पाष्टे यांनीही यापुढे जुनी कामे पुढच्या सभेपूर्वी पूर्ण करा, परत त्या कामावर चर्चा होता कामा नये अशा सूचना दिल्या.