बलात्कारी राम रहिमला २० वर्षांचा कारावास

सामना ऑनलाईन । पंचकुला

बलात्कार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग इन्सान याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एका बलात्कार प्रकरणासाठी १० वर्षांची शिक्षा अशा प्रकारे दोन बलात्कारांसाठी एकूण २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी दिली आहे. तसेच ३० लाखांचा दंडही सुनावण्यात आला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी रोहतक तुरुंगात जाऊन बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा गुरमीत राम रहिम याला शिक्षा सुनावली. न्यायाधीश जगदीप सिंह विशेष हेलिकॉप्टरने रोहतक तुरुंगामध्ये दाखल झाले होते.

न्यायालयाने दोन्हीकडच्या वकिलांना आपली बाजू मांडण्यासाठी १५-१५ मिनिटांचा कालावधी दिला होता. सीबीआयच्या वकिलांनी बाबा राम रहिम यांना २०  वर्षांची शिक्षा सुनावली जावी अशी मागणी केली होती.  तर बाबा राम रहिमच्या वकिलाने, राम रहिम समाजसेवक असल्याचे सांगत त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली. न्यायालयात सुनावणी सुरू असताना राम रहिम याने न्यायाधीशांना हात जोडून दयेची भीक मागितली. तसेच न्यायालयात राम रहिमला रडूही कोसळले.

आज राम रहिम याला शिक्षा सुनावली जाणार होती त्यामुळे राज्य पोलीस दलाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. हरियाणा पोलीस महासंचालक बी. एस. संधू यांनी राज्यातील सुरक्षेविषयी माहिती दिली. रोहतकमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कुठल्याही प्रकारचा हिंसाचार उसळू नये म्हणून निमलष्करी दलाला तैनात करण्यात आले आहे तसेच लष्कराचाही पर्याय उपलब्ध आहे, असे संधू यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते.

शुक्रवारी २५ ऑगस्टला पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहिमला दोषी ठरवल्यानंतर हरियाणासह पाच राज्यांमध्ये हिंसाचार उसळला होता. हिंसाचारामध्ये ३५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता, तर २५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. सोमवारी या प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार असल्याने पंजाब आणि हरियाणातील १३ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली.

दरम्यान, बलात्कारी राम रहिम याला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सिरसामध्ये दोन गाड्यांना आग लावण्यात आली आहे. सिरसामध्ये डेरा सच्चा सौदाच्या समर्थाकांनी हे कृत्य केले आहे.