बाबाचा डेरा उघडला, आतून निघाल्या ‘या’ गोष्टी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या बाबा राम रहिम याच्या डेऱ्याची सखोल तपासणी सुरू आहे. सुमारे ८०० एकरवर पसरलेल्या या डेऱ्याची तपासणी जसजशी केली जातेय तसतसं त्यातून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. यात टीव्ही प्रसारणात उपयोगी येणाऱ्या ओबी व्हॅन्स, नंबर नसलेल्या लेक्सस गाड्या, कोणतेही लेबल अथवा ब्रँड नसलेली औषधं, रोकड, कॉम्प्युटर, हार्डडिस्क आणि मोबाईल सापडले आहेत.

या खेरीज डेऱ्यात वापरलं जाणार प्लास्टिक चलनही सापडलं आहे. यात १० रुपयांच्या नाण्यापासून मोठ्या चलनाचा समावेश आहे. अर्थात या चलनाचा वापर नेमका कसा होत असे, याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही. आतापर्यंत डेऱ्यातील पाच खोल्यांना सील करण्यात आलं आहे. यातील दोन खोल्या पैशाने भरलेल्या आहेत. तसंच, डेऱ्यातील संशयास्पद ठिकाणांवर खोदकामही करण्यात आलं आहे.

शनिवारीही हा तपास सुरू राहणार असून या कामासाठी १००हून अधिक बँक कर्मचारी, पॅरामिलिटरी, पोलीस, सैन्य दलाच्या चार तुकड्या, ४ जिल्ह्यांची पोलीस यंत्रणा, एक श्वानपथक आणि फोरेंसिक विभागाची एक टीम इतकं मोठं मनुष्यबळ लावण्यात आलं आहे. याखेरीज जमीन खोदणारी यंत्रे, वाहने आणि ट्रॅक्टरही वापरण्यात येत आहेत. डेऱ्याच्या परिसराचे १० विभाग पाडले गेले असून विभागवार तपासणी सुरू आहे. बाबा राम रहिमच्या अटकेवेळी झालेली हिंसा लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने १० सप्टेंबरपर्यंत इंटरनेट सेवा खंडित केली आहे.