कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन निर्दोष मुक्त

कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात डॉन छोटा राजन याची सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यांअभावी ही मुक्तता करण्यात आली आहे.

16 जानेवारी 1997 रोजी दत्ता सामंत यांच्यावर विक्रोळी येथे काही अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने सामंत मृत्युमुखी पडले होते. कामगार नेत्याच्या अशा आकस्मिक हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी डॉ. सामंत यांचा चालक भीमराव सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून साकीनाका पोलीस ठाण्यात चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी हल्लेखोर गणपत बामणे, विजय थोपटे आणि अरुण लोंढे या तिघांविरोधात खटला चालून सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांचे अपिलही मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं आहे.

2015मध्ये छोटा राजन याला बाली इथून अटक झाली. त्यानंतर त्याचं प्रत्यार्पण झालं आणि त्याच्यावर दत्ता सामंत यांच्या हत्येशी संबंध असल्याच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, या हत्येत राजन याचा सहभाग असल्याचे कोणतेही सबळ पुरावे आढळून न आल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.