देशविदेश…केक्स

मीना आंबेरकर

नाताळ आता उंबरठ्यावर आहे. नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. ख्रिस्ती बांधवांचा हा अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा सण. शहरातील बेकऱ्या आता विविध चवीचे विविध ढंगांचे केक्स बजारात विक्रीला आणण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. एकंदरीत माहोल उत्साहाचा व आनंदाचा आहे. आजच्या काळात ख्रिसमस हा सण फक्त ख्रिस्ती बांधवांचाच नसून सर्वधर्मीय झाला आहे. या नाताळच्या सणात ‘केक’ हा महत्त्वाचा खाद्यपदार्थ असतो. खिस्ती धर्मीयांचे सर्वच इव्हेंट या ‘केक कापणे’ या कृतीने साजरे केले जातात. मग ते वाढदिवस असो, लग्न असो किंवा छोटा मोठा कोणतेही सेलिब्रेशन असो. आपणही आपले वाढदिवस कोणत्याही आनंदाचा प्रसंग केक कापून साजरे करतो. गृहिणी केक घरी बनवण्याचाही प्रयत्न करतात. नाताळच्या निमित्ताने आज आपण काही केक किंवा तत्सम काही खाद्यपर्थांच्या रेसिपीज पाहूया…

cack-2

निनाव

साहित्य…बेसन ४ वाटय़ा, नारळाचे दूध ८ वाट्या, गूळ ४ वाट्या, म्हशीचे दूध १ वाटी, साजूक तूप १ वाटी, वेलची पूड, जायफळ पूड, बदाम, काजूचे काप आवडीप्रमाणे.

कृती…प्रथम दोन्ही दुधात चोव व गूळ घालून ते सर्व मिश्रण एकत्र करावे व चुलीवर ठेवून मंद आचेवर घट्ट होईपर्यंत ढवळावे. ढवळताना वेलची, जायफळ पूड व हवे असल्यास काजू, बदाम काप टाकावेत. घट्ट झाल्यावर तूप घालून वर- खाली निखारे ठेवून चांगली वाफ आणावी मग थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावेत.

cack-3

खजूर केक

साहित्य…पाव किलो मैदा, पाव किलो पिठीसाखर पाव किलो लोणी, २ अंडी, दीडशे ग्रॅम खजूर, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा बेकिंग पावडर, १ कप दूध आणि अक्रोडचे तुकडे.

कृती…दूध, खजूर, अक्रोड मिक्सरमधून वाटून घ्यावेत. मैदा बेकिंग पावडर व सोडा घालून तीन वेळा चाळावा. अंडी एगबिटरने हलकी होईपर्यंत फेसावीत. साखर व लोणी एकत्र करून चांगले फेसावे, नंतर त्यात अंडी व वाटलेला खजूर व अक्रोड घालून सर्व चांगले फेसावे. नंतर मैदा घालून एकजीव होईपर्यंत फेसावे व मिश्रण भांडय़ात ओतून बेक करावे.

आंब्याच्या रसातलं सांदणं

साहित्य…दोन वाट्या रवा, दोन वाट्या आंब्याचा रस, दीड वाटी साखर, तूप, मीठ.

कृती…रवा तुपावर भाजावा, रसामध्ये साखर, किंचित मीठ घालून विरघळून घ्यावं. त्यात रवा, थोडी वेलची पूड घालून मिश्रण कालवावं. स्टीलच्या डब्यात हे मिश्रण ओतून झाकण लावावं आणि कुकरमध्ये डबा ठेवून उकडावं. अर्ध्या तासाने काढावं नंतर वड्या पाडाव्यात.

cack-4

धोंडस किंवा काकडीचा केक

साहित्य…मोठी काकडी १, भाजलेला रवा २ वाट्या, गूळ २ वाट्या, किसलेलं ओळ खोबरं १ वाटी, वेलची पूड १ चमचा, लोणी किंवा तूप एक वाटी, मीठ चिमूटभर, हळदीचे पान, खायचा सोडा चिमूटभर.

कृतीः काकडी साल काढून किसून घ्या. त्यातील पाणी काढून त्यात मावेल तेवढा रवा घाला. नंतर मीठ, गूळ, तूप, खोबरे, वेलची पूड व सोडा घालून एकत्र करा. केक पात्राला तूप लावून त्यावर हळदीचे पान ठेवा व तयार मिश्रण ओता. गॅसवर तव्यात वाळू घालून ती गरम झाल्यावर केकपात्र ठेवा किंवा ओव्हनमध्ये ब्रेक करून घ्या. खायला देताना वरून साजूक तूप घाला.