लातूर जिल्ह्यात 2075 मतदान केंद्रे, 18 लाख 83 हजार 534 मतदार


सामना प्रतिनिधी, लातूर

41 – लातूर (अनुसूचित जाती) लोकसभा मतदार संघासाठी 18 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 2 हजार 75 मतदान केंद्रावर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मुख्यालयी स्थित असलेल्या सुरक्षा कक्ष केंद्रातून मतदान पथके 17 एप्रिल 2019 रोजी मतदान केंद्रावर रवाना होतील, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्ष उमेदवर व त्यांच्या प्रतिनिधीची तसेच खर्चाशी संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे, खर्च समितीचे नोडल अधिकारी रत्नराज जवळगेकर यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालय स्थित असलेले मतदानाकरिता तयार करण्यात आलेले मतदान यंत्रे ठेवण्यात आलेले सुरक्ष कक्ष 17 एप्रिल 2019 रोजी सकाळी 8 वाजता उघडण्यात येतील. त्यावेळी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार अथवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी उपस्थित रहावे. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी 6 वाजता सर्व मतदान केंद्रावर अभिरुप मतदान घेण्यात येईल त्यानंतर सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होईल. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार मतदान केंद्रामध्ये रांगेत उभे राहतील त्यांचे मतदान झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया बंद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 41 – लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगाव लोहा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून एकूण मतदारांची संख्या 18 लाख 83 हजार 534 आहे तर मतदान केंद्राची संख्या 2075 आहे. मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर 8 हजार 300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून झोनल ऑफीसरची संख्या 227 इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

ज्या मतदान केंद्रावर बाराशे पेक्षा अधिक मतदार आहेत त्याठिकाणी शक्यतो एका अतिरिक्त मतदान कर्मचारी नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच ज्या मतदान केंद्रावर जास्तीत जास्त पडदांशीन महिला मतदार आहेत त्याठिकाणी एक महिला मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 48 क्रिटीकल मतदान केंद्रावर सुक्षम निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 3118 सैनिक मतदार असून 10 हजार 582 हे दिव्यांग मतदार आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मुख्यालय असलेल्या डिस्पॅच सेंटरवरून मतदान पथके व क्षेत्रीय अधिकारी रवाना होणार आहेत. त्याअनुषंगाने पोलिंग पार्टी घेऊन जाणारी एकूण 355 वाहने तर मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन येणारी 12 वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच लोकसभा मतदारसंघात एकूण 2075 मतदान केंद्राची संख्या असून त्याकरिता बॅलेट युनिट 2480, कंट्रोल युनिट 2480 व व्हीव्हीपॅट मशीन 2669 विधानसभानिहाय वितरित करण्यात आलेले आहेत, अशी माहिती श्रीकांत यांनी दिली.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून दोनशे मीटरच्या बाहेर राजकीय पक्ष उमेदवार यांना एक टेबल दोन खुर्च्यांची व्यवस्था करण्याची मुभा राहील. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. 23 मे 2019 रोजी लातूर शहरातील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे मतमोजणी होणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून सर्व राजकीय पक्ष उमेदवार यांनी निवडणुकीची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन निवडणूक प्रशासनामार्फत करण्यात आले.