हजारो दिव्यांच्या साथीने सिंधी समाजाचा धर्मांतर विरोधी निर्धार

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणण्याचे उद्योग उल्हासनगरात फोफावले असून सिंधी समाजातील हजारो कुटुंबे त्याला बळी पडली आहेत. हे धर्मांतर रोखण्यासाठी मंदिरात मेणबत्तीऐवजी तुपाचे दिवे उजळा, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सिंधी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आज झुलेलाल मंदिरात हजारो तुपाचे दिवे उजळले. यावेळी धर्मांतर रोखण्याचा निर्धारही करण्यात आला. या निर्धाराला शिवसेनेनेही पाठिंबा देत धर्मांतराला विरोध केला आहे.

रुपये आणि आमिषाला बळी पडून काही सिंधी समाजाचे नागरिक ख्रिश्चन धर्मात प्रवेश करत असून ते मंदिरात मेणबत्या पेटवून ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत आहेत. हे धर्मांतर रोखण्यासाठी सिंधी जागरूक मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यात संत भाऊ लिलाराम, सभागृह नेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक मनोज लासी, माजी नगरसेवक होशियारसिंग लबाना, सोनू विषणानी, शंकर नागरानी, कपिल ताराचंदानी, प्रकाश तलरेजा आदींचा समावेश आहे. १६ जुलैपासून कॅम्प नंबर १ मधील भाऊ परसराम झुलेलाल मंदिर येथे उपवासाचे महापर्व सुरू झालेले आहे. तसेच ८ ऑगस्टपासून कॅम्प नंबर ५ मधील चालिया मंदिरात ४० दिवसांच्या उपवासाचे महापर्व सुरू होणार आहे. या महापर्वात सिंधी समाजाने मेणबत्ती टाळून तुपाचा दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आलेले होते.

शिवसेनेचादेखील धर्मांतराला विरोध आहे. सिंधी जागरूक मंचने यासाठी घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद असून उपवासाच्या दोन्ही महापर्वाला आपण भेट देऊन शाबासकी देणार आहोत.
– राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख.