मेट्रो कारशेडसाठी मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन बदलला !

सामना ऑनलाईन, मुंबई

शासनाने मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा निश्चित केली असून या कारशेडसाठी मुंबईच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये राज्य सरकारने बेकायदेशीर फेरबदल केला आहे. या फेरबदलामुळे  मुंबईचे फुफ्फुस असलेला आरे कॉलनीतील हरितपट्टा नामशेष होणार असल्याचा आरोप करीत मुंबईतील रहिवाशांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी रहिवाशांनी याचिका दाखल केली असून २० मार्च रोजी त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.

कुलाबा ते सिप्झपर्यंत सुरू होणाऱया मुंबई मेट्रो तीनच्या कारशेडसाठी मेट्रो प्रशासनाने आरे कॉलनीतील सुमारे २५ एकर जागा ताब्यात घेतली आहे. ही जागा नाविकास क्षेत्र असतानाही त्याठिकाणी मेट्रो कारशेड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने चक्क २०३४च्या मुंबई डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये फेरफार केला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर रहिवाशांनी ही याचिका दाखल केली असून आपले म्हणणे याचिकाकर्त्यांनी याचिकेत सविस्तर मांडावे, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. याचिकेवर २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.