चौसाळा बायपासवरील थरार; भाविकांना बेदम मारहाण करत लुटले

5

सामना प्रतिनिधी । चौसाळा

रात्रीच्यावेळी रस्त्यावर खिळे पसरून टायर पंक्चर करायचा आणि वाहन थांबताच पुढे दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करायची, असे तंत्र वापरीत संभाजीनगरहून तुळजापूर येथे देव दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबाला जबरदस्त मारहाण करीत लुटण्यात आले. बांबू आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रूपयांचा किमती ऐवज लंपास केला.

रोडरॉबरीची ही थरारक घटना बीड तालुक्यातील चौसाळा बायपासवर शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, कार चालकाने प्रसंगावधान दाखवत चोरटे मारहाण करत असतांनाही कार तेथून सुसाट वेगाने पुढे नेली. त्यामुळे अनर्थ टळला. मारहाणीत जखमी झालेल्या दोन महिला आणि दोन पुरूषांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गावर घडलेल्या या घटनेने चौसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब ढोणे (४०), वैशाली बाळासाहेब ढोणे (३५), भागिरथी त्र्यंबक ढोणे (६०) व चालक चतुरसिंह लक्ष्मण राजपूूत (४७ सर्व रा.संभाजीनगर) अशी चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या भाविकांची नावे आहेत. बाळासाहेब ढोणे हे किराणा व्यापारी असून संभाजीनगरमध्ये ते किराणा दुकान चालवतात. पत्नी वैशालीसह त्यांचे दोन मुले व भागिरथी ढोणे यांच्यासह ते कारमधून (क्र.एम.एच.२० डी.एफ ०७३०) गुरूवारी रात्री उशीरा संभाजीनगर येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ते चौसाळा बायपासनजीक आले. याचवेळी त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाले. चालकाने पंक्चर झालेले चाक काढून तेथे गाडीतील दुसरे चाक बसवले. ते पुढे निघणार तोच अंधारातून पाच ते सात चोरटे हातात लाकडी दांडके घेवून तेथे आले. काही कळायच्या आत त्यांनी कारमधील कुटूंबियांना बेदम मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने सारेच भयभीत झाले. चोरट्यांनी गाडीवरही दगडफेक करत काचा फोडल्या. कारमधील वैशाली ढोणे व भागीरथी ढोणे यांनाही मारहाण करत त्यांच्या कानातील दागिने हिसकावून घेत गंभीर दुखापत केली. तर बाळासाहेब ढोणे व चालक चतुरसिंह यांचेही डोके फोडले. बेदम मारहाण होत असल्याने आमच्याकडील ऐवज घेवून जा पण मारहाण करू नका अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र चोरट्यांनी मारहाण सुरूच ठेवली. किंमती ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे तेथून पसार झाले. या घटनेने चौसाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी चौसाळा चौकीतील कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारचालकाचे प्रसंगावधान
चोरटयांकडून मारहाण होवू लागल्याने चालक चतुरसिंहने कार सुसाट पुढे नेली. त्या दरम्यान चोरट्यांनी कारवर दगडफेक केली. दरम्यान जखमी अवस्थेत कारमधील भाविक जवळच्या पेट्रोलपंपावर पोहचले. घडलेला प्रकार तेथील कर्मचाऱ्यांना कथन केल्यानंतर चौसाळा चौकीतील पोलीस तिथे आले त्यानंतर सर्वांना चौसाळा चौकीत व नंतर उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. भाविकांची कार पोलिसांनी चौसाळा चौकीसमोर आणून उभी केली.