ऊसतोड कामगारांवरील अन्यायाबाबत सरकारला अधिवेशनात जाब विचारू : धनंजय मुंडे

1

सामना प्रतिनिधी । बीड 

केवळ ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला म्हणुन ऊसतोड वाहतुक करणार्‍या प्रदिप कल्याण कुटे या मजुराचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. भूम तालुक्यातील सोनगिरी येथील प्रदिप कल्याण कुटे या ऊसतोड मजुराच्या कुटुंबीयांचे आज  विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांत्वन केले. या मजुराला मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे त्याच बरोबर ऊसतोड कामगारांवर वारंवार होणार्‍या अन्याय, अत्याचाराच्या घटनांबाबत आपण सरकारला जाब विचारणार असल्याचे मुंडे म्हणाले.

रविवारी रोजी माढा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दशरथ कुंभार व दिपक क्षीरसागर या दोघांनी क्षुल्लक कारणावरून प्रदिप कुटे यास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वेळीच वरिष्ठ पोलिसांना सुचना दिल्यामुळे त्या पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी मुंडे यांनी त्यांच्या सोनगिरी या गावी जाऊन  कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत आ.राहुल मोटे, ऍड.रवींद्र नागरगोजे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या कुटुंबीयांस स्वतःच्या वतीने आर्थिक मदत, कारखान्याकडून घेतलेल्या उचल व इतर बाबतीत सहकार्य करू तसेच शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळवून देऊ असे मुंडे यांनी कुटुंबीयांना सांगितले.

महामंडळ राहिले कामगारांना सुरक्षा तरी द्या

या पोलिसांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे फोनवर तक्रार केली. राज्यात ऊसतोड कामगारांवर अन्याय, अत्याचाराच्या अनेक घटना घडत असल्याने याबाबत आपण आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारू, चार वर्षात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ तर करता आले नाही, किमान या मजुरांना सुरक्षा तरी द्या अशी मागणी त्यांनी केली.