दिलीप प्रभावळकर यांचा दशक्रिया हा चित्रपट १७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच तीन राष्ट्रीय व अकरा महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित आणि संजय कृष्णाजी पाटील लिखित–प्रस्तुत आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली असून येत्या १७ नोव्हेंबर २०१७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील यांनी प्रथम पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरत दिग्दर्शनातील आपली चुणूक दाखवून दिली आहे. ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘दशक्रिया’ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा (रुपांतरीत), सर्वोत्कृष्ठ साहाय्यक अभिनेता अशा तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला तब्बल ११ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ आणि बर्लिन येथील ‘इंडिया वीक’ या विशेष विभागात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘दशक्रिया’ने जगभरातल्या सुजान आणि अभ्यासू रसिकांची वाहवा मिळविली आहे.

‘दशक्रिया’ या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचे प्रतिबिंब दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू रसिक प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत आहेत. जगभरातील चित्रपट महोत्सवांद्वारे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे वेगळे दर्शन घडवण्याचे काम हा चित्रपट करत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, बालकलाकार आर्य आढाव, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, आशा शेलार यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी ‘दशक्रिया’चा कॅनव्हास जिवंत केला आहे. अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढवण्यात यशस्वी ठरले असून स्वप्निल बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, मिलिंद जोशी यांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे.