धुळ्यात पारंपरिक ढोल दणाणणार, गणेशोत्सवानिमित्त कसून सराव

12

सामना प्रतिनिधी । धुळे

सार्वजनिक गणेशोत्सव 15 दिवसांवर आला असताना शहरातील ढोल वादक पथकांना उधाण आले आहे. शहरातील पांझरा किनारी अनेक पथके सध्या ढोल वादनाचा सराव करीत असल्याने ढोलांचे जोरदार आवाज घुमू लागले आहेत. त्यात महारूद्र, स्वरमुद्रा आणि आरंभ ग्रुप यांच्यासह अनेक कलापथकांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक ढोलताशांवर पदन्यास करता यावा आणि गणेशोत्सवाचा आनंद मनमुरादपणे लुटता यावा यासाठी आम्ही ढोल वादनाचा सराव करीत आहोत, अशी माहिती पथक प्रमुखाने दिली.

सण आणि उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्य वाजवीत पदन्यास करणे ओघानेच येते. मध्यंतरी अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत डीजेचा वापर झाला. पण डीजेवर संगीताचा गोडवा आणि लय योग्य पद्धतीने गवसत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम घेणाऱ्या संस्था आणि व्यक्तींकडून पारंपरिक ढोलताशा पथकांकडे विचारणा केली जात आहे.

गणेशोत्सवाचा निखळ आनंद घेता यावा म्हणून अनेक मंडळे आता ढोलताशा वादकांकडे चौकशी करीत आहेत. त्यासाठी ढोलताशा पथकांनी शहरात पांझरा किनारी कालिका देवी मंदिरालगत ढोलताशा वाजविण्याचा सराव सुरू केला आहे. ढोलताशाच्या वादनात विशिष्ट लय असते. गेल्या काही वर्षापासून ढोलताशा पथकाची मागणी होत नसल्याने वादक कमी झाले. त्यामुळे निरनिराळे पथके निर्माण करून इच्छुकांना ढोलताशा वाजविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या