बीसीसीआयचा धोनीला धक्का, ‘ए प्लस’ यादीत समावेश नाही

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंसोबत आपली नवीन ग्रेडप्रणाली जाहीर केली आहे. हिंदुस्थानचा माजी कर्णधार यष्टीरक्षक खेळाडू एम.एस.धोनी आणि आर. अश्विन या खेळाडूंना ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. ‘ए प्लस’ ग्रेडप्रणालीमध्ये कर्णधार विराट कोहलीसह पाच खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये असलेल्या या पाच खेळाडूंना बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी रुपये मिळणार आहेत.

बीसीसीआयकडून पुरुष क्रिकेट खेळाडूंसाठी ‘ए प्लस’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ या चार ग्रेडप्रणाली जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये असणाऱ्या खेळाडूंना ७ कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, ‘बी’ ग्रेडमध्ये असणाऱ्या खेळाडूंना ३ कोटी आणि ‘सी’ ग्रेडमध्ये असणाऱ्या खेळाडूंना १ कोटी रुपये वार्षिक रक्कम देण्यात येईल. ही ग्रेडप्रणाली ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८पर्यंत लागू असणार आहे.

शमीला स्थान नाही
बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या ग्रेडप्रणालीमध्ये हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेले नाही. वेगवान गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या शमीला हा दुसरा धक्का मानला जात आहे. याआधी शमीच्या पत्नीने त्याच्यावर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

कोणत्या ग्रेडमध्ये कोणते खेळाडू?
‘ए प्लस’ – विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रित बुमराह
‘ए’ – एम.एस. धोनी, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि ऋद्धीमान साहा.
‘बी’ – के.एल. राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा आणि दिनेश कार्तिक
‘सी’ – केदार जाधव, मनिष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिप पटेल आणि जयंत यादव.

महिला खेळाडूंसाठीची ग्रेडप्रणालीही जाहीर
पुरुष खेळाडूंसह महिला क्रिकेट खेळाडूंचीही ग्रेडप्रणाली बीसीसीआयने जाहीर केली आहे. ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा तीन ग्रेडमध्ये याचे विभाजन करण्यात आले आहे. ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना ५० लाख, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना ३० लाख आणि ‘सी’ ग्रेडमधील खेळाडूंना १० लाखांची वार्षिक रक्कम मिळणार आहे. ‘ए’ ग्रेडमध्ये कर्णधार मिताली राज, झुलन गोस्वामी, स्म्रिती मंधाना आणि हनमनप्रित कौर यांचा समावेश करण्यात आला आहे.