ठरलं तर, धोनी २०१९चा विश्वचषकही खेळणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक धोनी याच्या निवृत्तीबाबत बोलणाऱ्यांना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जोरदार चपराक लगावली आहे. शास्त्रींच्या मते मैदानावर धोनीचा चपळाई ही त्याच्यापेक्षा १० वर्ष तरुण असलेल्या खेळाडूला लाजवेल अशी आहे. धोनी सध्या एकदम फिट असून त्याची जागा घेणारा खेळाडू सध्यातरी नाही, असे म्हणत शास्त्री यांनी धोनीचे समर्थन केले आहे. धोनीवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वत:चा या वयातील खेळ पाहावा आणि मग इतरांवर टीका करावी, असा सल्लाही शास्त्री यांनी टिकाकारांना दिला आहे.

‘धोनीला संघाबाहेर ठेवण्याइतके आम्ही मूर्ख नाही. मी गेल्या ३० ते ४० वर्षांपासून क्रिकेट खेळत आलो आहे. विराट कोहली आणि धोनीची तुलना होऊ शकत नाही असंही शास्त्री म्हणाले. धोनी या वयातही २६ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशा चपळाईने धावू शकतो. जे लोक धोनीच्या वयाकडे बोट दाखवत निवृत्तीचा सल्ला देत आहेत त्यांनी आधी स्वत:चा खेळ पाहावा असं शास्त्रींनी म्हटलं आहे. धोनी या वयातही वेगाना दुहेरी धावा काढताना दिसतो, त्याच्यावर टीका करणारे वेगाने दुहेरी धाव काढत असले तर त्या ठिकाणी धोनीने तीन धावा काढल्या असत्या असं म्हणत शास्त्री यांनी टीकाकांरांच्या टीकेचे बाण मोडून फेकून दिले आहेत. धोनीने दोन विश्वचषक खेळले असून त्याने आत्तापर्यंत ५१च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. धोनीची जागा घेऊ शकेल असा एकही यष्टीरक्षक सध्या नाही’, असे शास्त्री म्हणाले. शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर धोनी २०१९चा विश्वचषक खेळणार हे पक्कं मानलं जात आहे.