बीसीसीआयच्या नव्या वेतनश्रेणीचा फटका धोनी, अश्विनला, दोन कोटींचे नुकसान

सामना प्रतिनिधी । मुंबई

बीसीसीआयच्या नव्या वेतनश्रेणीचा फटका महेंद्रसिंग धोनी व रविचंद्रन अश्विन या दोन सीनियर क्रिकेटपटूंना बसला आहे. बीसीसीआयकडून ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या सालासाठी क्रिकेटपटूंची सुधारित वेतन श्रेणी जाहीर करण्यात आली. या वर्षी पहिल्यांदाच ‘ए प्लस’ या नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आलाय. या श्रेणीत कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे पाच खेळाडू आहेत. या श्रेणीतील क्रिकेटपटूंना सात कोटी मानधन देण्यात येणार आहे. तसेच ए श्रेणीमधील महेंद्रसिंग धोनी, रविचंद्रन अश्विन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व रिद्धिमान साहा यांना पाच कोटी मानधनाच्या रूपात देण्यात येणार आहेत. ए प्लस व ए या दोन श्रेणीतील मानधनात दोन कोटींचा फरक असल्यामुळे महेंद्रसिंग धोनी व रविचंद्रन अश्विन यांना दोन कोटी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

शमीला पत्नीचे आरोप भोवले
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहाने यावेळी केला. त्यानंतर बीसीसीआयने कॉण्ट्रक्ट खेळाडूंच्या यादीतून त्याला वगळले आहे.

 खेळाडूंना २०० टक्के वाढ
बीसीसीआयच्या नव्या यादीत २७ खेळाडूंचा समावेश असून त्यांची ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. खेळाडूंच्या मानधनात बीसीसीआयने तब्बल २०० टक्क्यांनी वाढ केली आहे.