विश्वचषकाआधी धोनीने किमान दोन सामने तरी विश्रांती घ्यावी : माजी सलामीवीर श्रीकांत

सामना प्रतिनिधी । मुंबई

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखे अनुभवी खेळाडू टीम इंडियासाठी यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अतिशय लाभदायक ठरणार आहेत. त्यामुळे अशा लिजेंड खेळाडूंना जपणे हे संघव्यवस्थापनाचे प्रमुख कर्तव्य आहे. धोनीची पाठदुखी पूर्ण जाण्यासाठी त्याला आयपीएल स्पर्धेत किमान दोन सामन्यांची तरी विश्रांती देणे गरजेचे आहे, असे परखड मत टीम इंडियाचे माजी धडाकेबाज सलामीवीर के. श्रीकांत यांनी एका प्रमुख इंग्रजी दैनिकातील आपल्या स्तंभात व्यक्त केले आहे.नुकतीच यंदाच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, हार्दिक पांडय़ा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली होतीच. त्यांच्यासह लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली, तर यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून अनुभवी महेंद्रसिंग धोनीलाच संघात स्थान देण्यात आले आहे.

विश्वचषकासाठी जाणार्‍या संघात महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे, परंतु धोनीची तंदुरुस्तीदेखील महत्त्वाचा घटक आहे, असे श्रीकांत यांचे ठाम मत आहे. इंग्लंडमध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेऊन माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे, असे मत माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी मांडले आहे. धोनीला पाठदुखीचा त्रास होत आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पाठदुखीने उचल खाल्ली होती. त्यानंतर हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. 

विश्वचषकात धोनीचा अनुभव संघासाठी बहुमूल्यच

‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. अशा स्पर्धांमध्ये महत्त्वाचे अनुभवी खेळाडू फिट असणे गरजेचे आहे. त्यामुळे धोनीला आयपीएलच्या विमान दोन सामन्यांमध्ये तरी विश्रांती देण्याची गरज आहे. तो सध्या पाठदुखीने त्रस्त आहे. विश्वचषक स्पर्धेआधी त्याचा पाठदुखीचा त्रास दूर झाला पाहिजे. तो अनुभवी असल्यामुळे त्याचा अनुभव टीम इंडियाला खूप फायद्याचा ठरणार आहे,’ असे माजी कर्णधार श्रीकांत यांनी ‘आपल्या लेखात स्पष्ट केले आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत आठ सामन्यांमधील सहा डाव खेळले असून यात त्याने 230 धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.