निवृत्तीनंतर धोनी नेमकं काय करणार… जाणून घ्या!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महेंद्र सिंह धोनीवर सध्या त्याच्या खेळामुळे अनेक दिग्गज खेळाडू टीका करत आहेत. त्यामुळे धोनीने जर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर त्याचा पुढचा प्लान काय आहे? धोनी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर नेमकं काय करणार? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतील. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे. धोनी शनिवारी दुबईमध्ये त्याच्या क्रिकेट अॅकेडमीचं उद्घाटन करणार आहे. या अॅकेडमीसाठी धोनीनं दुबईतल्या पॅसिफिक व्हेन्चर्ससोबत पार्टनरशीप केली आहे. दुबईतल्या स्प्रिंगडेल्स स्कूल कॅम्पसमध्ये ही अॅकेडमी उभारण्यात आली आहे.

एम.एस.धोनी क्रिकेट अॅकेडमी (एमएसडीसीए) असं या अॅकेडमीचं नाव असेल. या अॅकेडमीचा धोनीच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणार आहे. अॅकेडमीमधल्या मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी धोनी स्वत: वेळोवेळी दुबईलाही जाणार आहे. हरभजन सिंग, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हिंदुस्थानात क्रिकेट अॅकेडमी सुरु केल्या आहेत. मात्र धोनी हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे जो परदेशामध्ये क्रिकेट अॅकेडमी सुरु करणार आहे.

राजकोटमध्ये न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर धोनीवर टीका केली होती. धोनीला या सामन्यात जलद रन्स बनवता आले नाहीत. यानंतर लक्ष्मण आणि आगरकरनं धोनीच्या संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र सेहवाग आणि गावस्कर यांनी मात्र धोनीची पाठराखण केली.