धुळय़ाचा पारा 9 अंशावर घसरला

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । धुळे

शहरासह जिल्हय़ाच्या तापमानाचा पारा सरासरी ९ अंशावर घसरल्याने सर्वत्र गारठा निर्माण झाला आहे. या गारठय़ाने शहराच्या बाजारपेठेवर तसेच जनजीवनावर परिणाम साधला आहे. गारठय़ामुळे रात्री बाजारपेठ साडेआठच्या सुमारास बंद होऊ लागली आहे. शिवाय सकाळी गारठा जास्त असल्याने बाजारपेठेची सुरुवातदेखील उशिराने होत आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी गरम कपडय़ांचा आधार घेतला आहे तर अनेकांनी मांसाहाराचे प्रमाण वाढविले आहे.

जिल्हय़ात यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे हिवाळा फारसा त्रासदायक ठरणार नाही असा अंदाज होता. पण उत्तरेकडे थंडीची लाट आली. ही लाट सातपुडा ओलांडून महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार आणि धुळे जिल्हा गारठला आहे. हिवाळय़ात सर्वसामान्यपणे थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे तापमान सरासरी ८ ते ९ सेल्सीअस असते. महाबळेश्वरच्या तापमानाची पातळी यंदा जिल्हय़ात नागरिक अनुभवत आहेत. शहराचे तापमान गेल्या चार दिवसांपासून ९.५ अंशाच्या आसपास स्थिरावले आहे. त्याचवेळी बागायत क्षेत्र जास्त असणाऱया शिरपूर आणि साक्री तालुक्यातील तापमानाचा पारा धुळय़ाच्या तुलनेत अजून कमी आहे. गारठय़ामुळे बाजारपेठेवर आणि जनजीवनावर परिणाम झाला आहे. रात्री साडेआठच्या आसपास बाजारपेठ बंद होऊ लागली आहे.

एरव्ही बाजारपेठेत साडेनऊ वाजेपर्यंत गजबज असते. शिवाय सकाळी तापमान सामान्य होण्यासाठी जवळपास दहा वाजू लागले आहेत. त्यामुळे एरवी ९ वाजता सुरू होणारा बाजारपेठेतला व्यवहार आता दहा वाजेला सुरू होत आहे. गारठल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल काही अंशी मंदावली आहे. थंडी सहन करता यावी यासाठी अनेकांनी उबदार कपडय़ांचा आधार घेतला आहे. अनेक जण टोपी, स्वेटर, हातमोजे सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. याशिवाय अनेकांनी आहारात मांसाहाराचे प्रमाण वाढविले आहे. मांस, मासे, अंडी आहारात आणण्याचे प्रमाण वाढले आहे.

थंडीमुळे अंडय़ाचे दर वाढले असून घाऊक बाजारात आता अंडे ५५ रुपये प्रतिडझन झाले आहेत. ज्यांनी मांसाहार वर्ज्य केला आहे त्यांनी थंडी सहन करण्यासाठी स्निग्ध पदार्थ आहारात आणले आहेत. त्यात सुका मेवा, मेथी आणि डिंकापासून बनविलेल्या लाडूसह अन्य पदार्थ आहारात घेतले जात आहेत.