धुळे ग्रामपंचायत निवडणूक- अर्ज छाननी 11 फेब्रुवारीला तर मतदान 24 फेब्रुवारीला

16
election

सामना प्रतिनिधी, धुळे

तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या 71 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शनिवारी गर्दी उसळली. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी दुपारी तीनला संपली. उमेदवार आणि त्यांच्या पाठीराख्यांमुळे तहसील कार्यालयाच्या आवारात उत्साह संचारला. दुपारी तीनपर्यंत इच्छुक उमेदवार समर्थकांसह येत राहिले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया दुपारी साडेचारपर्यंत सुरू राहिली. अर्जाची छाननी 11 फेब्रुवारीला तर मतदान 24 फेब्रुवारीला होणार आहे.

मार्चअखेर जिल्हय़ातील ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आहे अशा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रमात धुळे तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात आर्वी, जुन्नेर, हेंद्रुण, गोताणे, वडणे, काळखेडे, कुंडाणे-वरखेडे या गावांचा समावेश आहे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास 4 फेब्रुवारीला सुरुवात झाली. अर्जातील अटी-शर्ती आणि सूचनांची पूर्तता करताना अनेकांची दमछाक झाली. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत शनिवारी दुपारी तीन वाजता संपली. त्यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱयांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. दुपारी तीनपर्यंत अनेक इच्छुक आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयाच्या आवारात आले. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया दुपारी साडेचारपर्यंत चालली.

जुन्नेर येथे 7, हेंद्रुण – 13, आर्वी – 15, कुंडाणे-वरखेडे – 9, काळखेडा – 9, गोताणे येथे 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 11 फेब्रुवारीला होईल. त्यानंतर इच्छुकांना निर्धारित काळात माघार घेता येईल. माघारीनंतर ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी किंवा त्या वॉर्डातील जागेपेक्षा जास्त इच्छुक असतील तर 24 फेब्रुवारीला मतदान होईल. मतमोजणी 25 फेब्रुवारीला होईल. जिल्हाधिकाऱयांकडून अधिकृतपणे निकाल 27 फेब्रुवारील जाहीर होईल अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या