पहाटे हॉटेल उघडले नाही म्हणून बंदूक रोखली

फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, मुंबई

पहाटे चार वाजता हॉटेल उघडले नाही म्हणून दोन तरुणांनी चालक आणि कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखल्याची घटना वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे घडली. अंगद शेटे आणि कुवर शेटे अशी अटक केलेल्या भावांची नावे असून प्रसंगावधान राखून हॉटेल चालकाने पोलिसांना कळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वांद्रे पूर्वेकडील पिनॅकल कॉर्पोरेट पार्कमध्ये ‘बर्न किचन मॉल्ट रूम’ हे रेस्टॉरंट आणि लॉज आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अंगद आणि त्याचा भाऊ कुवर हे हॉटेलजवळ आले. हॉटेल बंद दिसल्याने त्यांनी शटर ठोठावले. पण चालक भाविक खान आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. दोघे भाऊ हॉटेल उघडण्यासाठी जबरदस्ती करू लागले. पण भाविक यांनी हॉटेल उघडले नाही. त्यामुळे दोघेही तेथून निघून गेले.

अंगद आणि कुवर पुन्हा पहाटे साडेचारच्या सुमारास आपल्या काही मित्रांना घेऊन आले. हॉटेल उघडत नसल्याने त्यांनी धमकावयाला सुरुवात केली. त्यांच्या हातात बंदूक असल्याचे पाहून भाविक यांनी त्यांच्या नकळत बीकेसी पोलिसांना कळविले. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि अंगद, कुवर यांना बंदुकीसह ताब्यात घेतले. बीकेसी पोलिसांनी दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.