धुरांच्या रेषा सोडणारे इंजिन इतिहासजमा होणार

सामना ऑनलाईन । मुंबई

डिझेल आणि कोळशावर होणारा कोट्य़वधी रुपयांचा खर्च वाचविण्यासाठी देशभरातील रेल्वे सेवा विजेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. २०२१ पर्यंत रेल्वेसाठी वीजजोडणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कोळसा, डिझेलसाठी रेल्वेला सध्या वर्षागणिक २६ हजार ५०० कोटी मोजावे लागतात. पण विजेच्या वापरामुळे या बिलात घट होऊन साधारण १६ हजार कोटी खर्च येईल.

वीजजोडणीसाठी रेल्वे बोर्ड इरकॉन, राईटस्, पीजी, पीजीसीआयएल यांसारख्या विविध संबंधित कंपन्यांशी फंड गोळा करणार असून ही योजना राबविण्यासाठी रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. या बैठकीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल आवर्जून उपस्थित होते. रेल्वे दरवर्षी ९५ हजार कोटी वीजबिल आणि १७ हजार कोटी डिझेल बिल अदा करीत आहे. पुढील पाच वर्षांत रेल्वेला ५००० इलेक्ट्रिक इंजिन्सची गरज लागणार असून सध्या रेल्वेकडे ४४ हजार इंजिन आहेत. वाराणसी आणि पश्चिम बंगाल येथील चित्तरंजन कारखान्यात या विजेवर धावणाऱया इंजिनची निर्मिती होणार आहे.