आहार अन् योग

भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, योग्य आहार, विहार, प्रयत्न कर्म, निद्रा आणि जागृती यांवर संयम असेल आणि त्यासह योगाभ्यास केला तर सर्व दुःखांचा परिहार होतो. अति आहार, अति उपवास, अतिनिद्रा अथवा अति जागरण करणाऱ्यांचा योग यशस्वी होत नाही.

आहार म्हणजे ज्या गोष्टींचा आपण स्वीकार करतो. ज्या गोष्टी आपण बाहेरून आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये घेतो त्याला आहार असे म्हटले आहे. हा आहार युक्त अर्थात योग्य असावा लागतो. डाएट या शब्दाचा अर्थ बरेच जण कमी खाणे असा करतात जो चुकीचा आहे. डाएट याला योग्य प्रतिशब्द आहे संतुलित आहार. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आणि आवश्यकतेनुसार आपल्या आहारामध्ये सगळे घटक असणे आवश्यक आहे. आपला आहार हा आपल्या शारीरिक गरजांनुसार, तसेच ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणच्या वातावरणाप्रमाणे असावा. आहार हा स्वच्छ, शुद्ध असावा. आहारामध्ये सर्व घटक योग्य त्या प्रमाणात असावेत. अर्थात मिठाचा खारटपणाही हवा, आमसूल किंवा चिंचेचा आंबटपणाही हवा, मिरचीचा तिखटपणाही हवा, साखरेचा गोडपणाही हवा, पाणी ज्याला आपण चवहीन म्हणतो त्या पाण्याचाही योग्य समावेश आपल्या आहारामध्ये असायला हवा.

जंक फूडचे प्रमाण सध्या प्रचंड वाढलेले आहे. फक्त फॅशन किंवा ट्रेंड या नावाखाली आपण पाश्चात्यांच्या आहाराच्या सवयीचे अंधानुकरण करत आहोत. पाव, पिझ्झा, बर्गर या गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. तसेच शीतपेयांचे प्रमाण नको तितके वाढत आहे. या सर्व गोष्टी पाश्चात्यांसाठी अनुकूल असल्या तरी आपल्यासाठी अनुकूलच असतील असे नाही.

संध्याकाळच्या भोजनाची वेळ

आपल्या देशातील वातावरण आणि तापमानाप्रमाणे आपला आहार असला पाहिजे. हा आहार केवळ योग्य प्रमाणात असून उपयोग नाही, तर तो आहार घेण्याची वेळ ही ठरावीक असली पाहिजे. आपल्या परंपरेनुसार, संस्कृतीनुसार, धर्मानुसार संध्याकाळचे जेवण हे सूर्यास्तापूर्वी झाले पाहिजे. तसे ते झाले तर रात्रीचे अन्नपचन होण्यास आपल्या शरीराला व्यवस्थित अवधी मिळतो. अन्न उत्तमरीत्या पचन होऊन त्यातील पोषणरस शरीराला उत्कृष्टपणे मिळतात. सध्याच्या जीवनशैलीमुळे सूर्यास्तापूर्वी जेवण घेणे शक्य नसेल तरी शक्यतो रात्री नऊच्या आधी जेवण होणे अपेक्षित आहे.

सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका

आहार म्हणजे इनटेक. बाहेरून आपण ज्या गोष्टी आपल्या शरीरात आणि मनात घेतो त्या सर्वांनाच आपण आपला आहार म्हणू शकतो. एक दुसऱ्या प्रकारचा आहार ज्याचे प्रमाण सध्या वाढलेले आहे आणि तो म्हणजे सोशल मीडिया. यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, इंटरनेट या सर्वांचा समावेश होतो. या सगळ्या गोष्टी उपयुक्त असल्या तरी त्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्यास त्यांची उपयुक्तता संपून उपद्रव मात्र जास्त सुरू होतो. या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यामुळे इतर कामकाजांचे व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन करण्यात आपण कमी पडतो आणि इतर गोष्टींवरचा आपला ताण वाढतो. त्यामुळे या गोष्टींचा अतिरिक्त वापर टाळावा त्यावर नियंत्रण आणावे.

सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in