जगावेगळी मैत्री

<< वाचावे असे काही >>

नातेसंबंधाच्या पलीकडे असलेली उदात्त, गहिरी भावना म्हणजे जीवाभावाचे मैत्र. असं मैत्र जोपासणाऱया राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांचे अनुभवकथन डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या ‘मैत्र जीवाचे’ या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळते. अशा मैत्रभावनेच्या लोभस छटांमधून आपल्याला अरुणा ढेरेंचं सावित्रीशी असलेलं नातं उलगडतं. मैत्रीचा हा अकृत्रिम धागा दर्शवणारा ‘जगावेगळी मैत्री’ हा या पुस्तकातील लेख.

महाभारत वाचता वाचता मी उपपर्वापाशी आले आणि त्यातली रामायणकथा संपवून पुढच्या म्हणजे दोनशे त्र्याण्णवाव्या अध्यायाकडे वळले. त्या उपपर्वाचं नाव होतं ‘पतिव्रता माहात्म्य पर्व.’ युधिष्टिराला मार्कंडेय मुनींनी ती सावित्री-सत्यवानाची गोष्ट पतिव्रतेचं माहात्म्य सांगण्याच्या उद्देशानं सांगितली होती.

मी ती कथा एकदा वाचली आणि आधी म्हटलं तशी त्या कथेतून सावित्री थेट माझ्याकडे चालत आली. मोठे मोठे, तेजस्वी आणि काळेभोर डोळे, उंच, शेलाटी, काळ्या शिसवी रंगाची, तिच्या मद्रदेशाचं सगळं काळं लावण्य तिच्याकडे होतं. केस कुरळे आणि दाट. केसांत भरपूर गजरे माळलेले, रुंद काठाची रेशमी साडी, अंगाने काळी असली तरी हिरव्या रंगाची, केशरी काठांची साडी तिला फार फार शोभत होती.

मी तर पाहताक्षणीच तिच्यावर लोभावले. तिच्या डोळ्यांतलं बुद्धीचं तेज अगदी आपली नजर बांधणारं, माझी तिच्याबद्दलची आधीची कल्पना तिनं चुरमडून बाजूला केली होती आणि जणू ‘बी’च्या कठीण कवचातून कोवळी हिरवी लवलव यावी किंवा प्रौढ, जन्मशरण अशा बाईचा मेकअप पुसून कुणी तरुण मुलगी हसून समोर यावी तसं झालं. प्रौढ नव्हती सावित्री, ती होती माझ्याएवढीच. कदाचित थोडी लहानच असेल अशी; म्हणजे चौदा-पंधरा वर्षांची एक तरुण मुलगी. मी वाचलेल्या तिच्या कथेला तिनं पुन्हा मला ती सांगता सांगता एकदम वेगळं, नवंच करून टाकलं. म्हणजे तपशील तेच, पण तिच्या नजरेतून त्यांचे अर्थ वेगळे झाले. त्यांचे कोन बदलले. ती भेटली नसती तर कदाचित माझ्याभोवती स्त्री धर्माच्या आंधळ्या स्वीकाराचे सूत फेरे तसेच राहिले असते. प्रत्यक्ष आयुष्याच्या संदर्भात कथेचा म्हणजे कलेचा उलगडा करण्याचं भान मला इतक्या लवकर, इतक्या सहजतेनं आणि इतक्या मोकळेपणानं आलं नसतं. निरपेक्ष आणि मोकळी मैत्री माणसाला किती समृद्ध करू शकते हे मला सावित्रीनं समजावलं. मुळात ती भेटेपर्यंत मला हे माहीतच नव्हतं की, तिच्या वडिलांनी तिच्यासाठी तप केलं होतं – म्हणजे लक्ष्मी आपल्या पोटी यावी अशी त्यांची इच्छा होती आणि लक्ष्मीनं त्यांना तसा शब्द दिला. म्हणून सावित्री जन्माला आली.

सावित्रीचे वडील अश्वपती हे मद्रदेशाचे राजे होते. मूल नाही म्हणून त्यांनी तप केलं आणि लक्ष्मी त्यांच्या घरी जन्माला आली. सावित्री लाडाकोडात वाढली, मोठी झाली. लग्नाच्या वयाची झाली. सुवर्णाची पुतळीच जणू, असं तिचं रूप होतं. एखादी राजकन्या, जी अप्रतिम लावण्यवती नसली तरी पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारी आहे, जी तारुण्याची स्वाभाविक नव्हाळी मिरवणारी आहे, तेजस्वी डोळ्यांनी बांधून ठेवणारी आहे, तिला खरं तर कुणाही उमद्या राजकुमारानं मागणी घालून उचलून न्यावं, इथे सावित्री तर कमललोचना होतीच. शिवाय देवकन्येसारखी तेजस्वी होती. तिची इच्छा धरून तिला मागणी घालण्यात राज्यांची स्पर्धा लागायला हवी होती. पण तसं झालं नाही. महाभारतानं काही सांगितलं नाही आणि सावित्री; ती फक्त हसली. मुलगी सुंदर असली की आवडते सगळ्यांना, पण बुद्धिमान मुलगी असली तरी झेपतेच असं नाही. कित्येक वेळा तर तिनं बुद्धिमान असणं हे गैरच ठरतं. बुद्धिमान नवऱ्याची बायको असणं ही बाईसाठी अभिमानाची गोष्ट ठरावी, असं समाज मानतो. पण बुद्धिमान बायकोचा नवरा अशी आपली ओळख असणं ना नवऱ्याला आवडतं ना समाजाला ते प्रतिष्ठेचं वाटतं! काय असेल ते असो, सावित्रीनं चर्चा केली नाही तर  वस्तुस्थिती अशी होती की, तिच्या एकूण तेजस्वी वावरानं दिपून गेल्यामुळे कुणीही तिला मागणी घालायला धजावलं नाही. ती उपवर मुलगी स्वयंप्रभेनं झळाळत अश्वपतीच्या घरी तशीच राहिली.

अशा मुलीच्या लग्नाचा निर्णय मग घ्यायचा तरी कसा? राजानं त्यावर सावित्रीकडेच तो अधिकार सोपवला. तिनं मला हे सांगितलं तेव्हा चकितच झाले मी. असं करता येतं? इतका जुना काळ तो. कसं शक्य झालं हे तेव्हा? पण बुद्धिमानच होती माझी मैत्रीण. तिनं हिंदुस्थानी विवाह संस्थेचा तोवरचा इतिहासच ऐकवला मला आणि म्हणाली की, उपवर मुलीला मागणी आली नाही तर तिचा पती शोधण्याचा पर्याय व्यवस्थेनं तिच्यासाठी ठेवला होता आणि तिच्या वडिलांनी तो पर्याय तिला घेऊ दिला होता.

ती समंजस होती, विचारी होती. स्वत:ची ओळख तिला झालेली होती. अवघड असतं ते स्वत:ला पाहणं, स्वत:ला ओळखणं आणि जनरीतीचा दबाव, संकोच, भय यांना त्यामुळे दूर फेकता येणं. तिला मागणी आली नाही यात दोष नव्हता. खोट नव्हती तिच्यात. उलट अतिशय लखलखत्या अशा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडत होता. तिच्या तेजानं इतरांचं खुजेपण बहुधा स्पष्ट जाणवलं होतं. लोकांना आणि त्या  खुज्या असलेल्यांनाही कदाचित पत्नी कशी हवी याच्या काही रूढी-कल्पना त्या काळच्या तरुणांच्या मनात असतीलही. ती गोड हवी, सद्वर्तनी हवी आणि त्याचबरोबर सेवाभावी नम्र व आज्ञाधारकही हवीच.

सावित्री या कल्पनांमध्ये बांधली जाणारी नसणार, नव्हतीच म्हणजे. कारण ती तेजस्वी होती, बुद्धिमान होती. बुद्धी आणि तेज यांचा तिच्या ठायी असलेला मिलाफ दुर्मिळ होता. ती देहानं सुंदर होती, पण त्याहीपेक्षा अधिक बुद्धीनं धारदार होती. तिला झुकवणं, हवं तसं वाकवणं, वापरणं किंवा आपल्या उंचीनं मोजणं शक्य नाही असं बहुधा लक्षात आलं असणार आणि परिसरातल्या लग्नेच्छू राजांनी तिचा विचार दूरच ठेवला असणार.

म्हणून सावित्री स्वत:च नवऱ्याच्या शोधात निघाली. इतिहासात तसं करणारी ही माझी मैत्रीण बहुधा एकमेवच होती असणार. ती रथातून निघाली आणि अनेक देशांमधले वन प्रदेश तिनं शोधले.

सत्यवान शारव देशाच्या पदच्युत राजाचा – द्युमत्सेनाचा तरुण मुलगा होता. एका आकस्मिक संकटासारखे द्युमत्सेनाचे डोळे गेले तेव्हा त्याचा मुलगा अगदी लहान होता. त्या संधीचा फायदा घेऊन शत्रूनं उठाव केला आणि राजा सत्ताहीन झाला. आपल्या बायको मुलासकट त्यानं एक वन प्रदेश जवळ केला आणि तो तपाचरणपूर्वक तिथेच राहू लागला. सत्यवान तरुण होईपर्यंतचा तो फार मोठा काळ गेला. सावित्रीला सत्यवान दिसला, भेटला आणि आवडला. तो तसाच होता आवडण्यासारखा, अतिदेखणा, तरुण, उदार आणि निष्कपटी, मेहनतीला न कंटाळणारा, साधी राहणी सहज स्वीकारलेला.

सावित्रीनं परत येऊन आपली निवड वडिलांना सांगितली, पण तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नारदांनी राजाला एक वेगळाच चमत्कारिक इशारा दिला. सत्यवान अल्पायुषी असल्याचं सांगून त्याच्या मरणाचं दिवसवेळेसकटचं भाकीत त्यांनी सांगितलं. अश्वपती मनातून हादरलेच असणार. पण त्यांचा आपल्या मुलीवर फार विश्वास असला पाहिजे. त्यांनी तिला सत्यवानाच्या अल्पायुष्याची कल्पना तर दिली, पण निर्णय मात्र तिच्यावरच सोपविला.

सावित्री असाधारण मुलगी होती. तिच्या तरुण वयाचा विचार करता कितीतरी प्रगल्भ होती ती. तिला स्वत:ला काय हवं ते स्वच्छ समजलं होतं. खरं तर विशीच्या आतल्या मुलामुलींना आपली आवड, आपले कल, आपल्या स्वभाव कळणं आणि आपला जोडीदार कसा हवा यासंबंधीच्या कल्पना स्पष्ट असणं ही गोष्ट दुर्मिळच म्हटली पाहिजे. पण सावित्रीला ते जणू आतून आपोआप कळलं होतं. तिनं सत्यवानाची निवड केली होती ती तिच्या मनानं, एकटीच्या इच्छेनं. कुणाचा धाक, कुणाची इच्छा, कुणाचं दडपण किंवा कुणाचा आठाह यांपैकी काही नव्हतं.  तिला जन्माचा जोडीदार म्हणून सत्यवान आवडला होता, एवढंच काय ते! आणि मग कळलेलं ते भीषण भविष्य. वर्षभरातच मृत्यूचं अटळ आमंत्रण. सत्यवान मरणार होता तरीही सावित्रीनं आपला निर्णय बदलला नाही ही गोष्ट फार मोठी होती. कुठून आणली तिनं ती ताकद, कोण जाणे! की तिच्या भोवतालच्या मुलींचे संसार पाहून काही वेगळ्या जाणिवा तिच्या मनात जाग्या झाल्या असतील? काळ कमी असला तरी चालेल, पण आवडीच्या माणसाबरोबर सुखाचा संसार करावा असं तर तिला वाटलं नसेल? मी ऐकविल्या तिला कुसुमाठाजांच्या पृथ्वीनं गायिलेल्या प्रेमगीताच्या ओळी, ‘नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे.’ दुर्बळांशी शृंगार करण्यापेक्षा समर्थाचं दूरपणही स्वीकारणारी आणि दुरूनच त्याच्यावर प्रेम करणारी पृथ्वी. सावित्री तिच्याच जातीची. तिचीच लेक जणू. दीर्घायुषी जोडीदाराबरोबर तडजोड करीत संसार करण्यापेक्षा अल्पायुषी, पण मनाजोग्या जोडीदाराबरोबर अल्पकाळ सुख भोगणं तिनं पसंत केलं.

स्वत:च्या निर्णयाला विचारपूर्वक स्वीकारणारी आणि नंतर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यमधर्माशी संवाद साधून त्याच्याकडून दोन्ही घरांचा आनंद परत मिळवणारी सावित्री समजली तेव्हा मी थक्कच झाले. पारंपरिक पातिव्रत्याच्या वेढ्यात कुणी अडकवलं तिला आणि कधी? माहीत नाही. पण ती तर मला भेटली ती अगदी स्वतंत्र, स्वयंप्रज्ञ आणि स्वाभिमानी मुलगी म्हणून. तिच्या भारती कथेवर काळाचा परिणाम आहेच. नाही कसं म्हणावं? स्त्रीयांची भूमिका कोणती, जीवनध्येय कोणते, आचारधर्म कोणता आणि जन्मसार्थक कोणते यांचे काही संकेत इतिहासाच्या प्रदीर्घ पटावर वेगवेगळय़ा कालखंडात जनसमूहांमध्ये निर्माण होत गेले आहेत. सावित्री कथेतही तिच्या पतिव्रतेच्या प्रतिमेला उजळणारे संकेत दिसतातच.

पण त्या सगळ्या संकेताला ओलांडत सावित्रीने माझ्या काळात पाऊल ठेवलं. स्वयंनिर्णयाचा अधिकार घेणारी, ती जबाबदारीनं निभावणारी आणि स्वत:ला ओळखणारी एक समंजस, विचारी, बुद्धिमान आणि सहृदय तरुण मुलगी म्हणून ती मला भेटली. तिने मला मानवीसंदर्भात इतिहास वाचायला शिकवलं. तिने मला काळाच्या मर्यादा ओळखायला शिकवलं. तिने निर्जीव आणि सांकेतिक तपशिलांचं फोलपण माझ्या ध्यानात आणून दिलं. तिने शब्दांतला माणसांचा आत्मा दाखवला. तिनं मिथकांमधलं जिवंत हृदय मोकळे श्वास भरून घेताना ऐकवलं आणि मला ऐकवलं; ती माझी मैत्रीण-सावित्री!

 

 

 

मराठी कवितेच्या विश्वात कवयित्रींचे स्वतंत्र दालन आहे. ते विशाल आणि समृद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात त्याची समृद्धी अधिकच वाढल्याचे दिसते. त्या विश्वातल्या कथा आणि व्यथा या बहुतेक ‘बाईपणा’च्या असल्याचे लक्षात येते. Œायांचा अपमान, उपेक्षा आणि अपयश यांच्या काटेरी झुडपांमध्ये रक्तबंबाळ होण्याच्या वेदनांना कवितारूप दिलेल्या असंख्य ओळींवर आसवांची रिमझिम, डोळे पाणावतात अन्  वाचक आतल्या आत चिंतन करतो. अशीच अंतर्मुख करणारी कविता आहे योगिनी राऊळ यांची.

‘बाईपणातून बाहेर पडताना’ या संठाहात योगिनीचा विद्रोही स्वर प्रकर्षाने जाणवतो,

अंतर, कायमचं मिटलेलं,

तरी कायमच असलेलं

एकमेकांच्या आठवणीतलं…

हे कटुसत्य पचवताना फार यातना होतात. त्यावर एक श्रद्धेचा उपाय म्हणून ‘विठ्ठलभक्ती’चे औषध गवसते अन् मग ती गाते,

नको नको रे सावळय़ा

नको पाहू असा अंत,

जन कोपले कितीही

काळजात तुझी मूर्त…

अष्टाक्षरी यमकांतून व्यक्त झालेल्या भावना जितक्या मर्मस्पर्शी आहेत, तितक्याच मुक्तछंद कविता हृदयस्पर्शी आहेत. योगिनीच्या कवितेची विशेषता हीच आहे की, स्वत:कडे आणि जगाकडे फार तटस्थपणे पाहताना तक्रारीच्या स्वरापेक्षा सत्यकथनाचा स्वर अधिक सुरेल आहे. सतीश भावसारांचे मुखपृ‰ अप्रतिम.

– अरविंद दोडे

बाईपणातून बाहेर पडताना

कवयित्री : योगिनी राऊळ

प्रकाशक : सृजन प्रकाशन

पृ‰s : 120, मूल्य : रु. 100/-