खमंग… खुसखुशीत!

मीना आंबेरकर

बिस्किट. सगळय़ांच्या चहाला सोबत करणारा स्वादिष्ट, खुसखुशीत प्रकार. बिस्किट्स घरी केली तर ती बऱयापैकी पौष्टिक होतात.

आजकाल लहाणांपासून थोरांपर्यंत बिस्किटे सर्वांनाच आवडतात. चटकन भूक शमविणार असा हा पदार्थ पाश्चात्याकडून आलेला हा पदार्थ तो आपल्याकडे इतका रूजला की तो अगदी आपलाच झाला. बिस्किटांचे विविध प्रकार आहेत. ते बाजारात उपलब्ध असतात. बिस्किटस् बनवण्याकरिता ओव्हनची आवश्यकता असते. तसेच यासाठी लागणारे घटक पदार्थ म्हणजे मैदा, साखर, लोणी, तूप हे साहित्य योग्य प्रमाणातच घेणे महत्त्वाचे असते. ते थोडेसे जरी कमी जास्त झाले तरी तो पदार्थ व्यवस्थित होत नाही. तसेच ओव्हनचे तापमानही ठरावीक ठेवणे आवश्यक असते, परंतु या सर्व बाबींकडे लक्ष दिले तर बिस्किटस् बनवणे अवघड नाही. बाजारातून बिस्किटे आणण्यापेक्षा घरच्या घरी सुग्रास बिस्किटस् बनवणे गृहिणींना निश्चितच आवडेल आणि आपल्या घरातील सदस्यांना पौष्टिक अशी बिस्किटे खिलवताना तिला नक्कीच आनंद होईल. तर मग बघूया तर बिस्किटे बनविण्याच्या कृती व त्यांचे प्रकार.

biscuits-3

बिस्किट

साहित्य 3 वाटय़ा मैदा, 1 वाटी लोणी किंवा डालडा, चिमूटभर मीठ, 1 वाटी पिठी साखर, 1 अंडे, एक चहाचा चमचा बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा.

कृती मैदा, बेकिंग पावडर व मीठ चाळून घेणे. साखर व लोणी एकत्र फेसून घ्यावे. त्यामध्ये अंडे घालून फेसावे. मैद्याचे मिश्रण थोडे थोडे घालून हाताने मळावे. गोळा तयार करून त्यात अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालावा. तीन सारखे भाग करावेत. प्रत्येक भागाची अर्धा से. मीटर जाडीची पोळी लाटावी. त्या पोळीची छोटय़ा गोल वाटीने किंवा बिस्किट कटरने बिस्किटे पाडावीत. ओव्हनमध्ये ठेवून भाजावीत. ओव्हनमध्ये बिस्किटे ठेवण्यापूर्वी ओव्हन अगोदर गरम करून घ्यावा.

bic-coco

कोकोनेट बिस्किटस्

साहित्य…दीड वाटी मैदा, 1 वाटी लोणी किंवा डालडा, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा खायचा सोडा, 50 ग्रॅम बाजारी खोबऱयाचा कीस, थोडे दूध.

कृती…तूप व साखर एकत्र करून फेसावे. नंतर त्यात मैदा, व्हॅनिला इसेन्स, खोबऱयाचा किस (थोडा वगळून) मिसळावे. सोडा घालावा. आवश्यक तेवढे दूध घालून पुरीच्या पिठाप्रमाणेच पीठ भिजवावे. त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्किटे कापावी. खोबऱयाच्या किसात एका बाजूने बुडवून ट्रेमध्ये गरम ओव्हनमध्ये भाजावीत.

nankatai

नानकटाई

साहित्य…2 वाटी मैदा, 1 वाटी घट्ट डालडा, 1 वाटी पिठीसाखर, वेळची पूड, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 2 चमचे दही.

कृती…डालडा परातीत पांढरे होईपर्यंत फेसावे. त्यात थोडी थोडी पिठीसाखर घालून फेसावे. थोडा थोडा मैदा घालून पिठाचा गोळा तयार करावा. वेलची पूड घालावी. दह्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून ते गोळय़ात मिसळून घ्यावे. छोटे छोटे पेढय़ाएवढे गोळे चपटे नानकटाई ट्रेवर लावून भाजून घ्यावी.

मधाची बिस्किटे

साहित्य…वनस्पती अगर साजूक तूप 1 वाटी, साखर अर्धी वाटी, मैदा दीड वाटी, मध दोन डाव, अर्धा चमचा वाटलेले आले, दालचिनी पूड एक चहाचा चमचा.

कृती…वरीलप्रमाणे सर्व साहित्य एकत्र करून चांगले मळा. पोळपाटावर थोडा मैदा घालून पाव इंच जाडीची पोळी लाटा, आवडीचा आकार देऊन गरम ओव्हनमध्ये 150 अंश सेंटिग्रेडवर दहा ते पंधरा मिनिटे भाजा.