मी पट्टीचा मांसाहारी – दिग्पाल लांजेकर

नवोदित नाटककार दिग्पाल लांजेकरविविध प्रकारचा मांसाहार त्यांना अतिशय प्रिय.

 • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – मनाला आनंद देतं ते खाणं. फक्त पोट भरण्यापेक्षा खाण्यातून मनाला आनंद मिळायला हवा.
 • खायला काय आवडतं? – आई उत्तम सुगरण असल्यामुळे लहानपणापासून चवदारच खाल्लंय. जे खातो ते फार चमचमीत नसतं, पण साधं आणि पौष्टिक असतं. मी पट्टीचा मांसाहारी आहे. उत्तम चवीचा कोणताही पदार्थ आवडतो.
 • डाएट करता का? – हो. संतुलित आहार घेतो. उदा. दोन प्रकारच्या भाज्या, कोशिंबीरी, भाकरी, भात असा चौरस आहार घेतो.
 • आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?– मुंबईला असलो की बाहेरचं खाणं होतं, तरीसुद्धा बाहेर कमी खाण्याचा प्रयत्न असतो. मित्रही सोबत असतात. त्यांच्यासाठी नवीन पदार्थ बनवायला मला खूप आवडतं.
 • कोणत्या हॉटेलमध्ये जाता?- लहानपणापासून खवय्या असल्यामुळे मी वेगवेगळ्या चवीच्या शोधात असतो. पुण्यातली बेडेकर मिसळ आणि बाबा जान चौकात माझ्या पैलवान नावाच्या मित्राच्या गाडीवरची मिसळ तसेच मालाड लिंकरोडवरील रेस्टॉरंटमध्ये मिळणारं थाय फूड मला आवडतं.
 • कोणतं पेय आवडतं? – कोकम सरबत, सोलकढी.
 • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा? – प्रयोगादरम्यान शक्यतो तेलकट, तूपकट, मसालेदार खाणे टाळतो. पोट बिघडू नये याची काळजी घेतो.
 • नाटकाच्या दौऱयादरम्यान आवडलेले खास पदार्थ? – हल्लीच अहमदाबादला गेलो होतो. तिथे खाल्लेलं खमण आणि काही गुजराथी पदार्थ खूपच छान होते. तिथे मिळणाऱया खमण ढोकळ्याची चव न्यारीच असते.
 • स्ट्रीट फूड आवडतं का? – हो. शेवपुरी. हा माझा आवडता पदार्थ आहे.
 • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?– आईच्या हातची चिंच, गूळ, शेंगदाणे घालून केलेली कारल्याची भाजी आणि वांग्याची भाजी.
 • उपवास करता का? – गणपतीला खूप मानतो. त्यामुळे दौरे असो वा नसो संकष्टी न चुकता करतो. त्या दिवशी फक्त फळांचा ज्यूसच घेतो.

टोस्ट ऑमलेट

अंडय़ात हळद, तिखट, मीठ आवडीनुसार घालून फेटून घ्यायचं. ब्रिटानियाचे टोस्ट यामध्ये बुडवून तव्यावर बटर घालून शॅलो फ्राय करायचे. अत्यंत सोपी आणि चवदार अशी ही रेसिपी आहे. तेल वापरत नाही कारण ते जास्त तेलकट होतात. त्यामुळे साधं बटर किंवा टेस्ट हवी असेल तर मसाला बटरमध्ये तळून घ्यावेत. हे तळलेले टोस्ट कॉफीसोबत खायला छान लागतात.