हिंदू दहशतवादाबद्दल दिग्विजय सिंह यांनी थापा मारल्या!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द शोधून काढत त्याबद्दल खोट्या कहाण्या बनवून त्याबद्दल थापा मारल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केंद्रीय गृहखात्यातील सचिव माजी आरव्हीएस मीणा यांनी केला आहे. त्यांच्या या बिनबुडाच्या आणि खोट्या कहाण्यांमुळे खरे दहशतवादी पळून गेले असं मीणा यांनी म्हटलं आहे. २०१० पर्यंत हिंदू दहशतवादाबद्दल आपण कधीही ऐकलं नव्हतं असं मीणा यांनी म्हटलं आहे, माझ्या माहितीनुसार त्यानंतरही हिंदू दहशतवाद अशी  कोणती गोष्ट अस्तित्वात नव्हती असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द वापरून सरकारी संस्थांचा गैरवापर करून काँग्रेसने आणि दिग्विजय सिंह यांनी खऱ्या दहशतवाद्यांना नुसतंच वाचवलं नाही तर त्यांना पळून जाण्यासही मदत केल्याचं मीणांनी म्हटलं आहे. याची काही उदाहरणे देखील त्यांनी दिली आहे. मीणा यांनी म्हटलंय की समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी आरिफ कासमानी, मक्का मस्जिद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बिलाल हे या खोट्या थिअरीमुळे पळून गेले. मीणा यांनी एक पुस्तक लिहलं असून त्यांनी या पुस्तकात याबाबत विस्ताराने लिहलं आहे. दिग्विजय सिंह यांनी हे असं का केलं? त्यांचा राजकीय अजेंडा काय होता हे माहिती नाही असं मीणा यांचं म्हणणं आहे.

दिग्विजय सिंह यांनी मात्र नेहेमीप्रमाणे त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. दहशतवादाचा कोणताही जात, धर्म नसतो असं म्हणत सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा पुन्हा आरोप केला. संघाच्या विचारांनी प्रभावित लोकांनी मालेगांवचे, समझौता ट्रेनमध्ये, मक्का मशिदीत स्फोट घडवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.