भोपाळमधून पराभवानंतर दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

120
digvijay-singh

सामना ऑनलाईन । भोपाळ

लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदारसंघावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस यांनी येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेसने ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञासिंह विजयी झाल्या असून दिग्विजय सिंह यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर निकालावर नाराजी व्यक्त करताना दिग्विजय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हा महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांच्या विचारसरणीचा विजय आहे अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. आज देशात महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांची विचारसरणी जिंकली आहे तर महात्मा गांधींच्या विचारसरणीचा पराभव झाला आहे. हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवला. काँग्रेसची लोकसभेच्या निवडणुकीत दयनीय अवस्था झाली. राज्यातील 29 पैकी 28 जागांवर भाजपाने विजय मिळवला असून फक्त एकाच जागेवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. छिंदवाडा मतदारसंघातून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल यांनी विजय मिळवला आहे. पराभवानंतर दिग्विजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या