बोगस शिक्षक दाखवून दिलकॅप इंजिनीयरिंग कॉलेजने मिळवली मान्यता

सामना प्रतिनिधी । मुंबई

मान्यता मिळवण्यासाठी इंजिनीयरिंग महाविद्यालये नवनवीन युक्त्या लढवत आहेत. नेरळ येथील दिलकॅप इंजिनीयरिंग महाविद्यालयाने 40 बोगस शिक्षक दाखवून तंत्रशिक्षणावर नियंत्रण ठेवणाऱया संस्थांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थेने तंत्रशिक्षण सचिवांकडे तक्रार केली आहे.

प्रत्येक इंजिनीयरिंग महाविद्यालयाला मान्यता वाढवण्यासाठी आपल्याकडील पायाभूत सुविधांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांबद्दल अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई विद्यापीठ आणि शुल्क नियंत्रण प्राधिकरणाला माहिती सादर करावी लागते. दिलकॅप इंजिनीयरिंगने माहिती सादर करताना 40 बोगस शिक्षक दाखवल्याचे तपासणीत उघड झाले. तसेच याच माहितीच्या आधारे महाविद्यालयाने फीवाढही मंजूर करून घेतली आहे.

दिलकॅप महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांचा प्रॉव्हिडंड फंडही भरला जात नाही. अनेक शिक्षकांची अकाऊंट उघडली गेलेली नाहीत तसेच त्यांना पेपर तपासणीचे मानधनही कधीच दिले जात नाही. याबाबत शिक्षकांनीच सिटीझन फोरमकडे तक्रार केली होती. त्यानुसार सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेऊन याप्रकरणी महाविद्यालयाविरुद्ध कारवाईची मागणी केली. या शिष्टमंडळात आमदार संजय केळकर, प्रा.वैभव नरवडे, प्रा.राहुल आंबेकर आदींचा समावेश होता.

तक्रार मागे घेण्यासाठी कर्मचाऱयांवर सक्ती;
महाविद्यालयावर प्रशासक नेमा

प्रॉव्हिडंड फंड कमिशनरने या महाविद्यालयाविरुद्ध कारवाईला सुरुवात करताच तेथील प्राचार्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी कर्मचाऱयांना तक्रार मागे घेण्याच्या निवेदनावर सह्या करण्याची सक्ती केली. त्याची तातडीने दखल घेऊन या महाविद्यालयावर प्रशासक नेमला पाहिजे.
– प्रा.राहुल आंबेकर