आरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत

सामना ऑनलाईन, चंदनझिरा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस उपनिरीक्षक दिलीप कचरूसिंग ठाकूर (रा.संभाजीनगर, प्रियदर्शनी कॉलनी जालना) याला अटक केली आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींची पोलीस कोठडी टाळण्यासाठी, अटकेत असताना मारहाण न करण्यासाठी ठाकूरने १८ हजार रुपयांची लाच मागितली होती.

आरोपींनी त्रास नको म्हणून ठाकूरला १० हजार रुपये दिले होते. उरलेल्या पैशांसाठी त्याने आरोपींच्या वडिलांना, भावाला आणि इतर नातेवाईकांना त्रास द्यायला सुरुवात केली होती.या त्रासाला कंटाळून नातेवाईकांनी ठाकूरविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे नूतन वसाहत जालना येथील आनंद
हॉटेलमध्ये  तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच ठाकूरला रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक रविंद्र डी. निकाळजे, पोलिस निरीक्षक आ.वि. काशिद, पोलिस निरीक्षक चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदिप दैंडे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रविण
खंदारे यांनी पार पाडली.