लेख : गुरवे नमः

दिलीप जोशी

[email protected]

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. पंचेचाळिशीतले आम्ही काही मित्र उत्तर हिंदुस्थान फिरायला गेलो होतो. तिथे सांचीचा भव्य स्तूप पाहताना बराच वेळ रेंगाळलो. फोटो काढले आणि समोरून येणाऱ्या नव्या पर्यटकांचं मराठीतलं बोलणं ऐकून थबकलो. परप्रांतात, परदेशात आपल्या भाषेत बोलणारं कोणी भेटलं की, घरचं माणूस भेटल्यासारखं वाटतं. त्या पर्यटकांच्या बसमधून एक वृद्ध गृहस्थ उतरले आणि माझ्या नि एका मित्राच्या चटकन लक्षात आलं, हे तर पेंडसे मास्तर! आम्ही दोघांनी पुढे होत त्यांना वाकून नमस्कार केला. सरांनी वयाची ऐंशी कधीच पार केली होती, पण पूर्वीसारखेच काटक दिसत होते. ‘‘पण नेमक्या कुठल्या शाळेतले तुम्ही? कारण म्युनिसिपल शाळेत माझी दहा वेळा तरी बदली झाली असेल…’’ ‘‘आम्ही राजावाडीच्या शाळेतले…’’ सरांनी किंचित विचार केला आणि म्हणाले, ‘‘म्हणजे एकोणसत्तरची बॅच तर…’’ आम्ही होकार दिला. त्याक्षणी अगदी शाळकरी झाल्यासारखं वाटत होतं. ‘‘अरे, एवढे ताडमाड उंच झालात… मी ओळखलंच नसतं..’’ मग शाळेतल्या आठवणी जागल्या. ‘‘चुकलात की, मी वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा करायचो ते विसरला नसाल ना?’’ मास्तरांनी मिश्कीलपणे विचारलं. ‘‘नाही… आणि कोकणातून येताना आठवणीने साऱ्या वर्गासाठी फणसाचे गोड गरे आणायचात तेही नाही विसरलो… गणित आणि विज्ञान तुम्हीच शाळा सुटल्यावर विशेष विनाशुल्क तास घेऊन शिकवत होतात हे कसं विसरणार?’’ सरांचे वृद्ध नेत्र पाणावले. ‘‘अरे, त्या तेव्हाच्या गोष्टी. आता तुम्ही इतके ज्ञानवंत झाला असाल की, मलाच चार गोष्टी शिकवाल.’’ ‘‘ज्ञानवंत झालो की नाही, ठाऊक नाही, पण तुम्हाला शिकवण्याएवढे मोठे नक्कीच झालेलो नाही.’’ वातावरणात भावुकता भरली. मग मास्तरच म्हणाले, ‘‘चला, चहा पिऊया…’’ उद्याच्या शिक्षक दिनाचा विचार करत असताना हे सारं आठवलं.

या घटनेलाही आता वीस वर्षे झाली. अजूनही ती जशीच्या तशी स्मरते. तोच क्षण कशाला, शाळेतला पहिला दिवसही आठवतो. फळय़ावर लिहिलेलं ‘कमल नमन कर, जगन नमन कर’ हे वाक्य दहावेळा पाटीवर लिहायला सांगून पाटीलबाई वर्गात फेऱ्या मारत प्रत्येकाला अक्षर ओळख नीट करून देत होत्या. माझ्या समोर आल्यावर त्या थबकल्या आणि म्हणाल्या, ‘‘विनायक (हे शाळेतलं खरं नाव), तू ‘नमन’ शब्द ‘मनन’ असं लिहिलंयस. घाई नको…’’ मग हसून म्हणाल्या ‘‘अरे, आधी विद्येला नमन करावं… मग मनन.’’ कसं कोणास ठाऊक, पण तो प्रसंग आजही एखाद्या चित्रफितीसारखा नजरेसमोर येतोय.

आम्हाला वेळोवेळी खूप चांगले गुरुजन भेटले. त्यांनी आमच्या जाणिवा समृद्ध केल्या. पाटील, पवार, पेंडसे, गुप्ते, नाबर, डाके, बर्वे, कळणकर अशी कितीतरी शिक्षक मंडळी आठवतात. शाळेजवळच्याच वस्तीतली आम्ही मुलं. त्यामुळे दिवाळीत अंगणात बनवलेले मातीचे किल्ले पाहायला नि फराळाला गुरुजनांना बोलावण्याची चढाओढ लागायची. गायनाचे पाडगावकर मास्तर अगदी आवर्जून यायचे. गुरुजी किंवा बाई घरी आल्या की, विलक्षण आनंद व्हायचा.

पुढे यथावकाश शाळा सुटली. कॉलेजमध्ये इंग्लिशमधून शिक्षण सुरू झालं. वेगवेगळय़ा विषयाच्या नामांकित प्राध्यापकांची व्याख्यानं त्यांच्या संमतीने ऐकण्यासाठी इतरही कॉलेजात जाणं व्हायचं. त्यापैकी राम जोशी पुढे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले आणि निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी आमच्या ‘खगोल मंडळा’त आकाशदर्शन कार्यक्रमासाठी आले तेव्हा त्यांना ही जुनी आठवण सांगितली. ‘‘आता तर तुम्ही विश्व नावाच्याच विद्यालयात अभ्यास करत आहात’’ ते हसून म्हणाले. अशा मोठय़ा माणसांची नुसती भेटही सुखावून जाते हे नंतरच्या काळात अनेक नामवंत खगोल शास्त्र्ाज्ञांशी झालेल्या संवादातून लक्षात आलं. प्रा. नारळीकर, चित्रे, आपटे अशा ज्येष्ठांची मोजकीच व्याख्यानं ऐकली तरी त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. हेसुद्धा आम्हां सर्वांचे गुरुजनच आहेत. आपल्या वैचारिक जाणिवा घडविणारे, समृद्ध करणारे, अज्ञानाची किल्मिषे दूर करणारे असे कितीतरी गुरुजन अनेक क्षेत्रांत भेटले. पत्रकारितेत वसंत सोपारकर असेच ‘गुरू’ ठरले. पुढे तर मित्र झाले आणि लिखाणातली वैचारिकता अभ्यासपूर्ण असावी हे त्यांनी शिकवलं.

आयुष्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यावर आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान देणारे अनेक ‘गुरू’ भेटतात. त्यातील काही तर वयाने लहान, पण अधिकाराने मोठेच असतात. म्हणून तर ‘बालादपि सुभाषितं ग्राहय़म्’ म्हणजे लहानांनी चांगलं (ज्ञानवर्धक) सांगितलं तर ते ग्रहण करावं असं आपली परंपरा सांगते. आमच्या खगोल मंडळातली शाळकरी म्हणून आलेली अनेक मुलं पुढे खूप मोठी झाली. अनेक जागतिक प्रकल्पांत संशोधक म्हणून नावाजली. त्यांच्याकडून कळत-नकळत आम्हीही शिकत गेलो. त्यापैकीच अनिकेत याने तर तो पदवीधर झाला तेव्हा के.जी. ते पी.जी. अशा सर्व शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. विशेष म्हणजे बहुतेक सर्व शिक्षक त्या सोहळय़ाला आले. मी तरी अशा प्रकारचा एकमेव सोहळा पाहिला आहे.

… आणि अगदी अलीकडची गोष्ट. खगोल संस्थेतल्या एका तरुण विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायची संधी मिळाली. जाण्यापूर्वी तो भेटायला आला. आमची संस्था त्याला ज्ञानार्जनासाठी कशी मार्गदर्शक ठरली असं लिहिलेलं पत्र त्याने दिलं आणि वाकून नमस्कारही केला. मी स्तिमित झालो. नवी पिढी अशी तशी वगैरे बोललं जातं. त्याच काळातला हा तरुण. त्याचीही भावना आम्हाला मास्तर भेटल्यावर झाली होती तशी होती. तर गुरुशिष्यांचं हे कृतज्ञतेचं नातं. परंपरेने पुढे चालणारं!