राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

 >>दिलीप चव्हाण<<

हिंदुस्थानात स्वातंत्र्यपूर्व काळात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. कारखान्यात होणारे अपघात, कामगारांचे आरोग्य आणि त्यांच्यासाठी हव्या असलेल्या कल्याणकारी योजना या बाबी विचारात घेऊन १८८१ मध्ये कामगारांसाठी त्यांच्या सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठी कायदा करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर मात्र हिंदुस्थान सरकारने याच कायद्याचे रूपांतर ‘कारखाने अधिनियम, १९४८’ असे केले.

नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे औद्योगिकीकरण झपाटय़ाने वाढू लागले. स्पर्धा निर्माण होऊ लागली. याचा परिणाम कामगार जीवनावर होऊ लागला. याचा सविस्तर विचार करता सरकारने, कामगारांची औद्योगिक सुरक्षा, आरोग्य  व पर्यावरण या विषयांवर काम करण्यासाठी ४ मार्च, १९६६ रोजी ‘राष्ट्रीय सुरक्षा परिषद’ या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. त्या वर्षापासून ४ मार्च हा संस्थेचा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ व त्या लगतचा सप्ताह ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ म्हणून देशभर पाळला जातो. त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय काम पाहते. कामगारांचे कामाचे तास, ते कार्यरत असलेल्या कामाच्या ठिकाणी असलेली परिस्थिती इ. बाबतीत बारकाईने दक्षता घेतली जाते. उद्योगधंदे भरभराटीला येणे म्हणजे देशाची प्रगती समजली जाते; परंतु जे कामगार आपले रक्त आटवून – घाम गाळून उद्योगधंदा फोफावतात – वाढवतात त्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणाबाबत तसेच कामगारांच्या तक्रारींवर राज्य व केंद्र शासनाने तयार केलेल्या धोरणानुसार उपाययोजना करणे, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि तक्रारींचे निवारण करणे याविषयी संचालनालय कार्यतत्पर असते. औद्योगिक क्षेत्रात जनजागृती व्हावी म्हणून सुरक्षिततेविषयी सुरक्षा स्पर्धा, घोषवाक्य, निबंध, पोस्टर्स, चित्रकला इ. स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. सुरक्षा नुसती समजली नाही तर ती भिनली पाहिजे हा त्या स्पर्धांमागचा हेतू असतो.

कर्मचाऱ्यांना काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी शूज, गमबूट, जॅकेट, टोपी इ. सुरक्षिततेची साधने पुरविली जातात. त्यांचा वापर कसा करायचा हेही प्रात्यक्षिकांसह दाखविले जाते, तरीसुद्धा ओव्हर स्मार्टपणामुळे अपघात होण्याची संख्या काही कमी नाही. जी अद्ययावत यंत्रे हाताळायची आहेत तीसुद्धा ‘गार्ड कव्हर’ने सुरक्षित ठेवलेली असतात. कामगारांना कामासंबंधी प्रशिक्षित केलेले असते. मागील वर्षी इमारतीला लागलेली आग विझविण्यास गेलेले फायरमन लिफ्टचा वापर करताना लिफ्ट बंद पडून गुदमरून मृत्युमुखी पडले. असा हेळसांडपणा, हलगर्जीपणा करून  केवळ स्वतःचं, संस्थेचं, कुटुंबाचंच नव्हे तर राष्ट्राचंसुद्धा नुकसान होते याचा विसर पडता कामा नये.

कारखाने, गोदामे, घरे यांना आगी लागून वित्तहानीबरोबर मनुष्यहानीसुद्धा होते. पर्यावरण बिघडते. छोटे-मोठे कारखाने सांडपाणी, रासायनिक द्रव्ये बेजबाबदारपणे कायदा धाब्यावर बसवून नदीनाल्यात सोडतात. अशाने जलचर प्राणी जिवास मुकतात. वाहनांचा धूर हीसुद्धा एक मोठी समस्या जाणवते. अशा एक ना अनेक गोष्टी पर्यावरणस बाधक ठरून मनुष्य जीवन घटवीत आहेत.

घरातील वायरिंग, वाहन चालविताना पाळावयाचे नियम, प्रवासातील प्रसंगावधानता बँकांतील व्यवहार, घरगडी, इमारतीतील वॉचमन ठेवताना घ्यावयाची काळजी इ. बाबतीत डोळे उघडे ठेवून वागल्यास फसवणूक न होता अपघात टळतील. कारखान्यांचे दरवर्षी जसे सुरक्षा ऑडिट केले जाते तसे आपल्या घराचे, स्वतःच्या प्रकृतीचे ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे, आढळणाऱ्या उणिवा वेळीच दूर करता येतात. त्यामुळे जीवन सुखमय बनते.

प्रत्येकाने – मग तो कोणत्याही सेवेत असो – त्याने ‘‘मी माझा देश मोठा करीन. त्यासाठी माझ्याकडून कोणताही, कसल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. मी माझे काम उच्च लेखून कसल्याही प्रकारची हेळसांड न करता लक्षपूर्वक करीन आणि स्वतः बरोबर इतरांच्या जीवितांची दक्षता घेईन.’’ अशी शपथ घेऊन आचरणात आणली तर आपण साजरा करीत असलेला राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.