लेख : वाहनसुराची गुंगी?

74

>>दिलीप जोशी<<

[email protected]

ज्या एकसुराविषयी आता लिहिणार आहे तो संगीतातला नव्हे. आम्ही शाळेत असताना सरकारचं ‘एक सूर एक ताल’ अभियान होतं आणि चतुरस्त्र संगीतकार वसंत देसाई मुलांच्या समूहाला गाणं शिकवायला यायचे. गाणं गायचं तर एक तरी सूर कंठात हवाय. अनेकांना ते वरदान जन्मजात लाभतं. त्यांचे सूर जगभर वर्षानुवर्षे गुंजतात आणि लाखो लोकांची मनं त्यात गुंतवतात. सध्या त्या नव्हे तर ‘गुंगी’ आणणाऱ्या सुरांबद्दल एक बातमी वाचली म्हणून त्यावर लिहावंसं वाटलं.

ऑस्ट्रेलियातल्या एका विद्यापीठातल्या अभ्यासकाने जगात होणाऱ्या कार अपघातांवर संशोधन केलं तेव्हा तो अशा निष्कर्षाप्रत आला की, सुमारे २० टक्के अपघात चालकाला ‘गुंगी’ आल्यामुळे होतात. बरं ही गुंगी मद्य किंवा आणखी कुठल्या व्यसनामुळे आलेली नसते तर चालकाच्या वाहनाच्या त्याच त्या आवाजाची (मोनोटोन) असते. त्या सततच्या आवाजाचा मेंदूवर नकळत परिणाम होतो आणि गुंगी येऊ लागते.

‘मोनोटोन’ किंवा कोणताही ‘एक सूर’ अशी गुंगी आणतो. एक साधी गोष्ट आठवून पाहा. आई बाळाला अंगाई गीत म्हणते त्याचे स्वर किंवा निजणाऱ्या बाळाला थोपटताना केलेला नुसताच अं…अं… किंवा उं…उं… असा स्वर. थोडय़ाच वेळात ते बाळ त्या सुरांशी तद्रूप होतं आणि झोपी जातं. दुसरं उदाहरण नक्की आठवेल. लांबच्या प्रवासाला रेल्वे मार्गाने जात असताना गप्पागोष्टी संपल्या किंवा एकटंच असल्यावर वाचन वगैरे झालं की गाडीच्या चाकांचा एकसुरी ध्वनी कानी येऊ लागतो. धड् धड् धड् धड् आणि त्या तालावर आपोआप पेंग येऊन डोळे मिटतात.

मात्र ‘गुंगी’ आणणारा हा सूर कर्कश असून चालत नाही. नाही तर झोपच येणार नाही. कर्णकर्कश वाद्यकल्लोळाची  झिंग येऊन अधिक नाचणं सुरू होतं. गुंगी किंवा झोप आणणारा स्वर हा खूप खालच्या पट्टीतला (लो फ्रिक्वेन्सीचा) असावा लागतो. रात्रीच्या नीरव शांततेत तर अशा मंद स्वरांनी मेंदूचा कब्जा लवकर घेतला जातो. अशावेळी वाहन चालवणाऱ्याला झोप आली तर अनर्थ होऊ शकतो. पहाटेच्या वेळचे अपघात बहुधा असेच होतात. खूप थकव्यामुळे किंवा प्रकृती बरी नसल्याने असं घडतं का? तर नाही. अगदी ठणठणीत व्यक्तीच्या मेंदूलाही ‘लो फ्रिक्वेन्सी’चा एक नाद (मोनोटोन) चकवा देऊ शकतो. त्यामुळेच वाहन चालवणाऱ्याच्या शेजारी बसणाऱ्याने नेहमी जागं राहावं आणि चालकाशी अधूनमधून (सारखा नव्हे) संवाद साधत त्याला ‘जागं’ ठेवावं असं सांगितलं जातं ते अशाच अनुभवातून आलेलं असणार.

हे झालं वाहनाच्या बाबतीत. पण एकूण जीवनातच ‘केवळ एकमेव सूर असून चालत नाही. हा ‘सूर’ केवळ संगीताचा नाही तर वागण्या-बोलण्याचा, कामाचा, छंदाचा आणि अनेक गोष्टींचा असू शकतो. एकच एक काम करताना कंटाळा येतो. मग ते बाजूला ठेवून थोडी मौजमजा करावीशी वाटते. हल्ली मोठय़ा कंपन्यांमध्ये तर कर्मचाऱ्यांना अधेमधे कॅण्टीनला जाऊन फ्रेश होऊन येण्याची मुभा असते. मानेवर जू ठेवल्यासारखे कामाचे तास भरले म्हणजे काम होतंच असं नाही. काहीच न सुचून पुस्तक नजरेसमोर असलं तर ‘अभ्यास’ होत नाही तसंच हे आहे. म्हणूनच इंग्लिशमध्ये ‘चेंज इन जॉब इज रिक्रिएशन’ म्हणजे कामातला बदल आनंददायी ठरतो असं म्हटलं जातं. अशा ‘रिक्रिएशन’मुळे (करमणूक) मन ताजंतवानं होऊन क्रिएशन (क्षमता) वाढते.

एकूणच जीवन अनेक सुरी, अनेकरंगी असावं. म्हणून तर सूर सात आहेत आणि इंद्रधनूचे रंगही सात. त्यांच्या वैविध्यपूर्ण मेळातून (फ्युजन) अधिक सूर अधिक रंग निर्माण करणं ही माणसाच्या मेंदूची किमया. आमच्या कॉलेजकाळात इंग्लिशच्या पुस्तकात एक धडा होता ‘युनिफॉर्मिटी अ डेंजर’ म्हणजे जीवनातला ‘एकसुरी’पणा घातक आहे. तो बोअरिंग, कंटाळवाणा ठरतो. त्यासाठीच माणूस नित्यनूतन गोष्टींच्या सहवासात आणि शोधात रमतो. त्या पाठात म्हटलं होतं की, सभोवतालची सारी सृष्टी झाडं-पानं, पाणी, आकाश, सगळे प्राणी आणि आपणही एकाच रंगाचे असतो तर? आमचे सर म्हणाले होते की, ‘कल्पना करून पाहा आपण सगळेच एका रंगाचे नि आपले कपडे, वस्तूही त्याच रंगाच्या कारण सृष्टीत दुसरा रंगच नाही. कल्पनेनेच अंगावर शहारा येईल. अर्थात युनिफॉर्मिटी काही ठिकाणी आवश्यक आणि चांगलीही असते. तसाच ‘अंगाई’साठीचा ‘मोनोटोन’ किंवा एकसूरही चांगलाच पण तो चुकीच्या वेळी त्रास देऊ लागला तर ‘जागं’ राहायला हवं.

याच पाठातला पुढचा निष्कर्ष होता की, सतत रचनात्मक बदल आयुष्यात घडावा. कारण ‘व्हरायटी इज अ चेंज’ म्हणजे जीवनातील विविधतेचा बदल गंमत आणतो. पण अनेकरंगी विश्वात अनेकसुरी आसमंतात अनेकांना आपला ‘सूर’ सापडतच नाही असंही होतं. तो ‘सूर’ सापडणं म्हणजे शतरंगांनी, शतस्वरांनी आयुष्य समृद्ध करणं.

सुरुवात झाली होती ती वाहनांच्या मोनोटोनच्या गडबडीमुळे. मग त्याबाबत काय करायचं? तर चालकाला ‘वाहनसुराने’ गुंगी येऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारची चालकाची खुर्ची (सीट) बनवण्याची शिफारस या संशोधकांनी केली. ती खुर्ची चालकाला अधूनमधून सूक्ष्म धक्का देऊन जागं ठेवेल आणि संभाव्य अपघात टळेल. शेवटी प्रत्येक सुराच्या ‘मैफली’ची रीत ठरवलेली असते. अन्यथा ती ‘बेसूर’ होऊ शकते. मग ते वाहन असो अथवा जीव.

आपली प्रतिक्रिया द्या