आभाळमाया : ‘बुडीत’ खंडाचा शोध?

वैश्विक

[email protected]

आपल्या पृथ्वीचे वय साडेचार अब्ज वर्षांचे आहे. पाच अब्ज वर्षांपूर्वी आपला सूर्य निर्माण झाल्यानंतर जी ग्रहमाला निर्माण झाली त्यात पृथ्वी ‘आकाराला’ यायला आणखी पन्नास कोटी वर्षे लागली. तेव्हापासून पृथ्वी, त्यावरील सजीव-निर्जीवांसह सूर्याभोवती फिरत आहे आणि सूर्य-पृथ्वीचे हे नाते आणखी चार ते पाच अब्ज वर्षे टिकणार आहे. अशा या पृथ्वी नावाच्या पाणीदार आणि हिरवाईने नटलेल्या ग्रहावर माणसाचे राज्य अगदी अलीकडे म्हणजे काही लाख वर्षांपूर्वी आले आणि आजचे जे यंत्र-तंत्रयुगाचे ‘प्रगत’ वेगवान जीवन आपण जगतोय ते तर अवघ्या चार-पाचशे वर्षांचे आहे. परंतु ज्या काळात ही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती किंवा सूक्ष्म जीवांपुरती सीमित होती त्या काळातला पृथ्वीचा भूगोल आजच्या पाठय़पुस्तकात असतो तसा नव्हता. म्हणजे पृथ्वी आहे तशीच होती, पण तिच्या पृष्ठभागावर आज दिसणारी आशिया, युरोप, उत्तर-दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंड आज आहेत तसे नव्हते. हे सारे भूभाग एकमेकाला चिकटून होते. त्याला ‘पॅन्जिया’ म्हणतात. कालांतराने त्याचे दक्षिण व उत्तर असे दोन तुकडे झाले. त्यापैकी दक्षिणेकडील तुकडय़ाला गोंडवन लॅण्ड म्हटले गेले आणि त्याचाच एक भाग असलेले हिंदुस्थानी उपखंड वर सरकत सरकत सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आशिया खंडाला धडकले. त्यामुळे त्या दोन्हीच्या मध्ये असलेल्या समुद्राचा तळ पर्वतासारखा उंच झाला. तोच नगाधिराज हिमालय. म्हणूनच हिमालयाला आपल्या सहय़ाद्रीपेक्षा खूप तरुण पर्वत म्हटले जाते आणि हिमालयात उंच जागी जलचरांचे जीवाश्म (फॉसिल) आढळतात.

भूगोलाच्या पृष्ठभागावरील भूभागांचे सरकणे, बदलणे, समुद्रात काही भूभाग कायमचा बुडणे किंवा सागरतळ उंचावून पृष्ठभागावरची भूमी निर्माण होणे ही प्रक्रिया पृथ्वीच्या निर्मितीनंतर कोटय़वधी वर्षे अव्याहत सुरू होती. आजही क्वचित अशा घटना घडताना आढळतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे फिजी बेटे पाण्याखाली जाणे किंवा मालदीव देश उद्या पाण्याखाली जाण्याची धास्ती निर्माण होणे याची कल्पना त्या देशालाही आहे. याकडे उर्वरित जगाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या सरकारने पाणबुडय़ांसारखा वेश धारण करून चक्क सागरतळी (अण्डरवॉटर) मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती.

उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण प्राचीन काळात आपल्याकडेही द्वारका बेट बुडाल्याचे दाखले आहेत. ती केवळ पुराणकथा म्हणावी तर बुडालेल्या द्वारकानगरीच्या तटबंदीचा आणि काही वस्तूंचा शोध गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील सागरतळी लागला आहे. या सगळय़ा गोष्टींचे स्मरण आज होण्याचे कारण म्हणजे गेल्या महिन्यात ‘जॉडिस रेझोल्युशन’ नावाचे सागरतळाचा शोध घेऊन उत्खनन करणारे जहाज (ड्रील शिप) एका महत्त्वाच्या कामगिरीवर निघाले आहे. लेखाच्या सुरुवातीला पृथ्वीवरच्या सध्याच्या सात खंडांचा उल्लेख केला, त्यात भर घालणारे, पण सांप्रत समुद्रतळाशी विसावलेले ‘झीलॅण्डिया’ नावाचे आठवे खंड शोधून त्यावर वैज्ञानिक शिक्कामोर्तब करण्याचे कार्य या उत्खनन जहाजाने स्वीकारले आहे.

हे झीलॅण्डिया खंड हिंदुस्थानच्या दीडपट विस्ताराचे असून त्याचा विस्तार 1 कोटी 90 लाख चौरस मैल एवढा आहे. न्यूझीलॅण्ड बेटाच्या दक्षिण-पूर्व टोकापासून ऑस्ट्रेलियाच्या उत्तरपूर्व टोकापर्यंत या ‘झीलॅण्डिया’ खंडाचा विस्तार मानला जातो. सुमारे साडेसात कोटी वर्षांपूर्वी हा भूभाग ऑस्ट्रेलियाचाच एक भाग होता. म्हणजे साधारणपणे हिंदुस्थानी उपखंड पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे सरकण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळी ऑस्ट्रेलियातही काही भूरचनात्मक बदल घडले असावेत. भूगर्भतज्ञ त्याबाबत निश्चित सांगू शकतील.

साडेसात कोटी वर्षांपूर्वी ‘झीलॅण्डिया’ भूभाग ऑस्ट्रेलियापासून विलग व्हायला आरंभ झाला आणि सुमारे साडेपाच कोटी वर्षांपूर्वी ही प्रक्रिया थांबली. तोपर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागावरची भूमी समुद्राने गिळंकृत केली होती. न्यूझीलॅण्डच्या वेलिंग्टन विद्यापीठातील तज्ञ यावर अभ्यास करीत आहेत.

आता जे ड्रील शिप या आठव्या-खंडाच्या शोधार्थ निघाले आहे, ते सागरतळी उत्खनन करून एवढा मोठा भूभाग पाण्याखाली जाण्याइतका कोणता भूगर्भीय उत्पात घडला, उग्र ज्वालामुखी असलेला प्रशांत (पॅसिफिक) महासागरातल्या ‘रिंग ऑफ फायर’ची निर्मिती कोणत्या भूकंपातून आणि कोणत्या ‘प्लेट टेक्नॉनिक’च्या हालचालीतून घडली यावर प्रकाश टाकणार आहे. माणसाच्या बुद्धिमत्तेतून निर्माण झालेल्या आधुनिक विज्ञानाचा विधायक उपयोग हा असा असतो. एका बाजूला अंतराळात झेप घेऊन थेट सूर्याच्या प्रांगणात जाण्यासारखी अवकाशयाने आपण तयार करतो आणि त्याचवेळी आपल्या पृथ्वीवरच्या सागरतळाचा धांडोळा घेऊन तिथे दडलेली विस्मयकारी सत्यंही शोधून काढतो. ‘झीलॅण्डिया’ खंडामुळे केवळ सप्तखंडांमध्ये एकाची भर पडणार एवढेच त्याचे मर्यादित स्वरूप नाही, तर पृथ्वीवरील भूपृष्ठरचनेतील तो मोठा दुवा ठरणार आहे. अभ्यासाचा ‘सखोलपणा’ असाच असावा लागतो!