आभाळमाया – हबलची दुरुस्ती

>>दिलीप जोशी<<

[email protected]

हबलस्पेस टेलिस्कोप म्हणजे माणसाचा अंतराळातला तिसरा डोळा. प्रसिद्ध खागोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांच्या नावे अंतराळात सोडलेल्या या दुर्बिणीच्या देदीप्यमान कार्याला १५ वर्षे झाली. एवढय़ा काळात अवकाशातील आतापर्यंत अज्ञात, अप्राप्य असलेल्या वस्तूंचे म्हणजे दूरस्थ दीर्घिका (गॅलॅक्सी), नेब्युले (तेजोमेघ) यांचे अक्षरशः लक्षावधी फोटो ‘हबल’ने पृथ्वीकडे पाठवले आणि आपला कार्यकाळ सतत जागता ठेवला. मात्र या दुर्बिणीच्या अवकाश स्थापनेनंतर थोडय़ाच काळात त्याच्यावर संकट आलं होतं. अचानक हतबल झालेल्या हबलला एखाद्या ‘ट्रबल-शूटर’ची मदत होती. ती पूर्ण करून ‘हबल’ला पुन्हा ‘सबल’ करणाऱ्या अंतराळयात्रींच्या समूहातली एक व्यक्ती कॅथरिन रायन कॉर्डेल थॉर्नटन. अमेरिकेच्या या महिला अंतराळयात्रीने अवकाशयानाबाहेर जाऊन ‘हबल’चा ‘सोलार-ऍरे’चा आखडलेला ‘हात’ कसा दुरुस्त केला याची छायाचित्रं तेव्हा प्रसिद्ध झालीच, पण या सगळय़ाचं चित्रीकरण केलेला माहितीपटही उपलब्ध आहे.

कॅथरिन थॉर्नटन यांनी अंतराळात व्यतीत केलेल्या ९७५ तासांपैकी २१ तास एक्स्ट्राव्हेक्युलर ऍक्टिव्हिटी (ईव्हीए) म्हणजे यानाबाहेर  जाऊन केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे आहेत.

अमेरिकेतल्या अलाबामा राज्यातील मॉन्टगेमेरी इथे १९५२ मध्ये जन्मलेल्या कॅथरिनचं इंजिनीअरिंगचं शिक्षण व्हर्जिनिया विद्यापीठात झालं. १९७९ मध्ये या विषयात त्यांना पीएचडी मिळाली.

१९८४ मध्ये ‘नासा’ने त्यांची अंतराळ प्रशिक्षणासाठी निवड केली. १९८५ मध्ये त्यांना ‘अंतराळवीर’ झाल्याचं सांगण्यात आलं आणि १९८९च्या नोव्हेंबरमध्ये अंतराळात उड्डाण करणाऱ्या ‘स्पेस शटल’मधून त्यांना अवकाश भ्रमणाची संधी मिळाली. अर्थात हे भ्रमण मौजमजेचं  नव्हे तर अनेक वैज्ञानिक प्रयोग यशस्वी करण्याचं आव्हान होतं. एकूण चारवेळा कॅथरिन यांना अवकाशयात्रेचा अनुभव घेता आला. पहिल्या वेळी ‘डिस्कव्हरी’ यानातून पाच दिवसांची अंतराळ सफर घडली.

दुसऱ्या वेळी ‘एन्डेव्हर’ यानातून १९९२ मध्ये त्यांना अंतराळात जाऊन चारवेळा ‘स्पेसवॉक’ करून ‘आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट’ची दुरुस्ती करावी लागली. स्पेस स्टेशनच्या तांत्रिक कार्याचा आढावाही त्यांनी घेतला.

त्यांची अंतराळातील तिसरी खेप खगोल वैज्ञानिक आणि अभ्यासक दोघांच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. ‘एन्डेव्हर’ स्पेस शटलमधून खास हबल टेलिस्कोपच्या दुरुस्तीसाठी त्यांनी अंतराळाकडे प्रयाण केलं. फ्लोरिडामधल्या केप केनेडी अंतराळ तळावरून २ डिसेंबर १९९३ रोजी उड्डाण केलेल्या ‘एन्डेव्हर’मधल्या पथकाने नादुरुस्त होऊन कार्यकाळ अल्पावधीतच संपतो की काय अशी धास्ती असलेल्या ‘हबल’ अंतराळ दुर्बिणीला ‘धीर’ दिला. ११ दिवसांच्या या मोहिमेत ‘हबल’ पुन्हा योग्य कक्षेत स्थिरावून त्याचा अडकलेला ‘सोलार ऍरे’ मुक्त करण्यात कॅथरिन थॉर्नटन यांना यश आलं. या यशानंतर ‘हबल’चं कार्य जोमाने सुरू झालं ते आजतागायत अव्याहत सुरू आहे. शेवटच्या ‘फ्लाइट’मध्ये (१९९५) त्यांनी पे-लोड कमांडर म्हणून काम केलं. चारवेळा अंतराळात जाऊन ९७५ तासांतील २१ तास यानाबाहेर जाऊन तांत्रिक काम यशस्वी केल्याचा अनुभव घेऊन कॅथरिन नंतरच्या काळात मेकॅनिकल आणि एअरोस्पेस इंजिनीअरिंगच्या प्राध्यापक म्हणून पुन्हा कार्यरत झाल्या.