आभाळमाया : विदुषी आणि कलाकार

>>वैश्विक, [email protected]

साहसी अंतराळयात्रेत सहभागी होऊन विविध वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या महिला जीवनाच्या इतर क्षेत्रांत किती प्रगती करतात ते आपल्याला या लेखमालेतील अनेक अंतराळयात्रींच्या परिचयावरून लक्षात आलं असेल. याच मालिकेतली एक विद्वान, कलावंत आणि डॉक्टरही असलेली अंतराळयात्री म्हणजे मे जेमिसन, अमेरिकेची पहिली आफ्रिकन-अमेरिकन अंतराळवीर. एन्डेव्हर अवकाशयानातून 12 सप्टेंबर 1992 रोजी त्यांना अंतराळात जाण्याची संधी लाभली.

अमेरिकेतील अलाबामा राज्यात 1957 मध्ये जेमिसन यांचा जन्म झाला. वडील एका समाजोपयोगी संस्थेत काम करणारे, तर आई गणित आणि इंग्लिशची शिक्षिका. घरातलं वातावरण मुक्त विचारांचं. हे कुटुंब नंतर शिकागो शहरात आलं. तिथे शिकत असतानाच बाल जेमिसनला आपण स्पेसमध्ये भ्रमण करावं असं प्रकर्षाने वाटायचं. ‘‘कधी ना कधी मी अंतराळ प्रवास करणारच’’ असं ती म्हणायची. कारण रोज कामावर जाण्यासारखंच अंतराळ प्रवास करणं सोपं आहे असं तेव्हा तिला वाटायचं.

लहानपणापासूनच जेमिसनला वैज्ञानिक विषयांची आवड होती. तिच्या आई-वडिलांनी तिची ही आवड ओळखून तिला सतत प्रोत्साहन दिलं. ‘लहानपणी मला डायनोसॉर, तारे आणि अंतराळाविषयी खूप कुतूहल वाटायचं असं तिनं म्हटलंय. आयुष्यात प्रगती करून दाखवण्यासाठी तिचं प्रेरणास्थान होतं आफ्रिकन – अमेरिकनांच्या हक्कांसाठी लढणारे डॉ. मार्टिन ल्युथर किंग.

जेमिसनने अकराव्या वर्षी आफ्रिकन नृत्यशैली शिकून घेतली. जॅझ वगेरे शिकून झाल्यावर तिने जपानी पद्धतीच्या नृत्यात प्रावीण्य मिळवलं. पुढे तिने स्वतःचीच नृत्यशाळाही सुरू केली.

याच काळात तिचं शिक्षणही सुरू होतंच. स्टॅनफर्ड विद्यापीठातून ती केमिकल इंजिनीअर झाली. तिथेही तिने ‘आऊट ऑफ द शॅडोज’ या नृत्याविष्काराची कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर कॉर्नेल मेडिकल कॉलेजमधून जेमिसनने एम.डी. ही वैद्यक शास्त्रातील पदवी प्राप्त केली. एक डॉक्टर म्हणून शांती पथकासमवेत काम करण्याचा अनुभवही घेतला.

अशा अनुभवसंपन्न जेमिसन यांना 1983 मध्ये नासाच्या अंतराळयात्री कार्यक्रमात प्रवेश मिळाला. त्यासाठी जेमिसनची प्रेरणा होती. ‘स्टार ट्रेक’ मालिकेतली आफ्रिकन – अमेरिकन अभिनेत्री निचेल निकोलस.

जेमिसन यांचं भावी अंतराळयात्री म्हणून प्रशिक्षण सुरू झालं आणि काही काळातच (1986) चॅलेंजर स्पेस शटलचा भीषण अपघात झाला. त्यामुळे ‘नासा’च्या कार्यक्रमाला थोडी खीळ बसली. मग 1987 मध्ये पुन्हा अर्ज केल्यावर जेमिसन यांची 2000 पैकी 15 उमेदवारांत निवड झाली.

फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशनवर जेमिसन यांना स्पेस शटलच्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची तपासणी करण्याचं काम मिळालं.

1992 च्या सप्टेंबरमध्ये जेमिसन यांचं बालपणापासूनचं अंतराळयात्री होण्याचं स्वप्न साकार झालं. आठ दिवसांच्या अंतराळयात्रेचा अनुभव मिळाला. जपानशी सहयोग केलेलं ते अमेरिकेचं सुवर्ण महोत्सवी ‘स्पेस-मिशन’ होतं. यामध्ये डॉक्टर जेमिसन यांना अंतराळयात्रींच्या हाडांवर तेथील वास्तवाचा काय परिणाम होतो या अभ्यासासह चाळीसहून अधिक वैज्ञानिक प्रयोग करण्याची संधी मिळाली.

1993 मध्ये त्यांनी ‘नासा’तून बाहेर पडून तंत्रज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. जनसामान्यांच्या विज्ञानाविषयीच्या धारणा काय असतात याचा त्यांनी मागोवा घेतला.

डान्सर, इंजिनीअर, डॉक्टर, समाजशास्त्रज्ञ असलेल्या या अंतराळयात्री महिलेने नंतर ‘स्टार ट्रेक – नेक्स्ट जनरेशन’ या मालिकेत अभिनेत्री म्हणूनही काम केलं. मे जेमिसन यांचं व्यक्तिमत्त्व खरोखरच जिद्दी, व्यासंगी आणि अष्टपैलू म्हणायला हवं.