सृष्टी आणि दृष्टी

प्रत्येक वर्षी सणवार येतात, नवी पिकं येतात, पाऊस पडतो. अशा निसर्गक्रमातील आणि माणसाच्या जीवनातील गोष्टींचे राहाटगाडगे सुरूच असते. रहाट म्हणजे विहिरीतून पाणी शेंदण्याचे (उपसण्याचे) लाकडी किंवा लोखंडी चक्र. रहाटगाडगे म्हणजे जत्रेतल्या उंच गोल पाळण्याच्या चक्रासारखा गाडगी, मडकी बसवलेला सतत चाललेला मोठा रहाटच. आता तो क्वचितच पाहायला मिळेल. त्यातली गाडगी क्रमाक्रमाने खाली-वर होण्याचे चक्र ते रहाटगाडगे. कालचक्र तसेच असते. आपल्या आयुष्यात पुनः पुन्हा त्याच गोष्टी घडत असतात. रोज तोच सूर्य उगवतो इथपासून रात्रीपर्यंतच्या घटना आठवून पहा. रोज नव्या उत्साहाने आपण काल-आज-उद्याची जुळणी करीत जगत असतो. माणसांइतकेच ते इतर जीवसृष्टीबाबतही खरे आहे. पावसाळा ‘नेमेचि’ येतो (किंवा पूर्वी तरी यायचा) तसे निसर्गातील तेच बदल प्रतिवर्षी नवे रूप धारण करून येत असतात. याचा ‘साक्षात्कार’ थोडे सजगपणे आसपासच्या परिसर न्याहाळण्यासाठी वेळ दिला तर होऊ शकतो. दुर्गाबाई भागवत यांनी मुंबईतल्या घराच्या खिडकीतून वर्षभराचे ‘ऋतुचक्र’ अनुभवले होते!

सध्या राज्यात आणि देशातही हवा कोरडी आहे. सूर्य दक्षिण गोलार्धावर तळपत असल्याने आपल्यापासून ‘दूर’ आहे. त्यामुळे अर्थातच थंडीची चाहूल लागलीय. ही चाहूल पूर्वी म्हणजे चाळिसेक वर्षांपूर्वी शहरी भागातही पहाटेच्या धुक्यातून लागायची. ‘दिवस’ लहान होत चालल्याने आता ‘मोठय़ा’ रात्री थंडी टिकवून ठेवतात.

याच काळात जिथे अतिशय म्हणजे गोठवणारी थंडी पडते तिथली काही ‘मंडळी’ आपला प्रदेश सोडून नव्या ऊबदार जागेच्या शोधात उड्डाण करतात. खरे तर या ‘मंडळीं’ना अवघी पृथ्वीच ‘आपली’ असते. हे स्थलांतरित पक्षी खऱ्या अर्थाने ‘ग्लोबलायझेशन’चा अनुभव हजारो वर्षे घेत आहेत. माणसाने विमानाच्या कृत्रिम पंखांवर वेगवान उड्डाण करण्याच्या शेकडो वर्षे आधी हे पक्षी आपल्या पंखातल्या आणि फुप्फुसातल्या बळावर हवेवर स्वार व्हायला शिकले आहेत. त्यांना पाहूनच माणसाला ‘उडण्याची’ कल्पना सुचली. मात्र बिनपंखांच्या माणसाला विमानाची गरज लागते. पक्ष्यांचे तसे नाही. त्यांची भरारी त्यांच्या गरजेप्रमाणे आणि ‘मनात’ येईल तेव्हा होत असते; परंतु त्यातही एक नैसर्गिक शिस्त असते. मुंबईच्या परिसरातल्या जागेत खिडकीतून मला या काळात समोरच्या सुबाभूळ आणि गुलमोहरांच्या झाडांवर या पक्ष्यांचा दिनक्रम दिसतो. त्यात हजारो कावळे, चिमण्या, साळुंक्या आणि पोपट यांचे वसतिस्थान (अधिवास) ठरलेले असते. संध्याकाळच्या वेळेला चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या ‘घरी’ येऊन स्थिरस्थावर होण्यासाठी अक्षरशः कालवा करतात. त्यांच्या चिवचिवाटापुढे बिचारे कावळे थव्याने उडत येऊन झाडांच्या वरच्या भागात शांतपणे बसलेले दिसतात. त्यांना कंठ फुटतो तो पहाटे. एका झाडावर राघू-मैनांची वस्ती दिसते. तिथे इतर कुणी जात नाही. वसंत ऋतूत कोकीळ मात्र याच भागात आपले मोसमी ‘घर’ थाटतात. पुढे मार्च-एप्रिलमध्ये कोकीळकुजन कानी पडेल. आता मात्र पहाटे कावळे-चिमण्या उपजीविकेसाठी बाहेर पडल्या की, रिकाम्या झाडांवर काही स्थलांतरित शुभ आणि करडय़ा रंगाचे बगळे काही काळ स्थिरावतात.

तिथेच कुठेतरी भारद्वाज पक्ष्याचे जोडपे येते. निळा रॉबिन (दयाळ) किंवा खंडय़ा (किंगफिशर) तसेच पिवळय़ा-तपकिरी रंगाचा इवलासा धोबी पक्षी लक्ष वेधून घेतो. सुतार (वुडपेकर) पक्षी येतो. तांबटाची (कॉपरस्मिथ) ‘टिक्टिक्’ कानी पडते. शेजारीच वाहणाऱ्या रेल्वे ट्रेनच्या आणि स्टेशनवर चाललेल्या माणसांच्या गदारोळातही हे पक्षी आपला स्वर टिकवून असतात. दुभंगत्या शेपटीचा कोतवाल (ड्रॉन्गो) पक्षीही आता दिसू लागेल, तर तुरेवाला हुदहुद किंवा ‘हुप्पू’ क्वचित दर्शन देईल.

तरी हा शहरी भाग. तिथून आठ-दहा किलोमीटरवर असलेल्या जंगल भागात दोन वर्षांपूर्वी एशियन पॅरेडाईज या सुंदर पक्ष्याचे जोडपे नियमाने येते. पक्षी असे नियमानेच येतात. फ्लेमिंगो, सीगल मोठय़ा थव्याने अवतरतात. नाशिकजवळचं नांदूर-मधमेश्वर, मुंबईतले वडाळा किंवा राज्यात इतर अनेक ठिकाणी अशी रंगीबेरंगी पंखांची आणि विविध आकारांची पक्षीसृष्टी दरवर्षी प्रगटते. ब्रॉब्लर हा पाच ग्रॅम वजनाचा पक्षी तर थेट सायबेरियातून काही हजार किलोमीटरचे अंतर पंखांतून पेलत आपल्या देशात येतो. राज्यातल्या अनेक वन विभागांत आणि भरतपूरच्या पक्षी अभयारण्यात आता पक्ष्यांचा उत्सव असेल. आपले जीवन समृद्ध करायला सारी सृष्टी तत्पर असते. आपली दृष्टी मात्र तशी हवी.