आभाळमाया : स्वप्न युजिनचे

वैश्विक

[email protected]

गेल्या आठवडय़ात आपण सूर्याकडे झेपावलेल्या ‘नासा’च्या पहिल्यावहिल्या ‘पार्कर सोलार प्रोब’ची थोडक्यात माहिती घेतली. या ‘प्रोब’ यानाचा प्रवास जसजसा पुढे सरकेल तसतशी त्याची खबर पृथ्वीवर येत राहील आणि वेळोवेळी आपण त्या ‘सूर्यशोध’ मोहिमेवर निघालेल्या उड्डाण प्रकल्पाची माहिती घेऊ.

या ‘पार्कर सोलार प्रोब’ची संकल्पना 2009 मध्ये निधी प्राप्त झाल्यावर कार्यान्वित होऊ शकली. त्यावेळी या संशोधन यानाचं नाव सोलार प्रोब किंवा सोलार प्रोब प्लस असं ठेवण्यात आलं. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या उपयोजित भौतिकशास्त्र विभागाने या अवकाशयानाची बांधणी केली. 2015 मध्येच सर्व तयारी झाली, परंतु काही ना काही तांत्रिक कारणांमुळे उड्डाण पुढे ढकलावं लागलं. अगदी गेल्या 11 ऑगस्टला होणारं उड्डाणही शेवटच्या क्षणी स्थगित करून 12 ऑगस्टला अखेर या यानाने यशस्वी अवकाशगमन केलं. सुमारे 7 वर्षांचा कालावधी या यानाला सूर्याजवळ पोचायला लागणार असल्याने आटोकाट काळजी आणि वारंवार बारकाईने तपासणी करूनच उड्डाण करणं गरजेचं होतं, म्हणून वेळ लागला तरी यशस्वीतेसाठी हा विलंब आवश्यक ठरला.

हे यान युजिन न्यूमन पार्कर या प्रसिद्ध खगोलभौतिक शास्त्रज्ञाचं नाव धारण करून अवकाशात मार्गक्रमण करत आहे. प्रसिद्ध खगोलविदांचं स्मरण करण्यासाठी अशी नावं दिली जातात. आपणही आपल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाला खगोलविद आर्यभट्ट यांचं नाव दिलं होतं. सध्या अवकाशात एडवीन हबल यांच्या नावे जशी एक दुर्बिण कार्यरत आहे तशीच आणखी एक (एक्स-रे) दुर्बिण हिंदुस्थानी वंशाचे शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम (सर सी.व्ही. रामन यांचे पुतणे) यांच्या नावे ‘चंद्रा टेलिस्कोप’ म्हणून अंतराळात विहरत आहे.

खगोल भौतिकशास्त्रज्ञ युजिन पार्कर यांचा जन्म 1927 मध्ये झाला. सध्या ते 91 वर्षांचे आहेत. आपल्या नावे पहिलं ‘सोलार यान’ अवकाशात गेलेलं पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे.

1950 मध्ये सूर्याचा अभ्यास करत असताना त्यांनी ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने वाहणारे सौर-वारे आणि सर्पिल आकाराचं चुंबकीय क्षेत्र सूर्याच्या बाहेरच्या भागात असावं असं निरीक्षण नोंदवलं. सूर्याच्या प्रभामंडळाचं तापमान तो विरळ असला तरी सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त कसं याचं उत्तर शोधताना युजिन यांनी सौर पृष्ठावरून उसळणाऱया सूक्ष्म सौरज्वाळांचा (नॅनोफ्लेअर) हा परिणाम असावा असं म्हटलं. त्यांच्या या संशोधनाची वैज्ञानिक जगताने दखल घेतली.

1948 मध्येच भौतिकशास्त्रात पीएच.डी. मिळवणाऱया पार्कर यांनी विविध विद्यापीठांत अध्यापन आणि एन्रिको फर्मी संस्थेमध्ये संशोधन केलं आहे. 1967 पासून ते अमेरिकेच्या ‘नॅशनल ऍकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे सदस्य आहेत.

पार्कर यांनी त्यांचं सूर्याच्या प्रभामंडळाबाबतचं (करोनाबद्दलचं) संशोधन ‘एस्ट्रोफिजिकल जर्नल’कडे पाठवलं तेव्हा दोन परीक्षकांनी ते नाकारलं, पण संपादक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी पार्कर यांचा शोध-निबंध (पेपर) प्रसिद्ध केला. आता याच सुब्रमण्यमनंतर पार्कर यांचं नाव थेट अंतराळात सूर्याच्या भेटीला जात आहे. एखाद्या अंतराळयानाला हयात व्यक्तीचं नाव ‘नासा’ने देण्याची ही पहिलीच वेळ. त्यातच युजिन पार्कर यांच्या कर्तृत्वाची पावती आणि त्यांच्याविषयीचा आदर आहे!